संगीत माणसाला हसायला, जगायला आणि आनंदी राहायला नेहमीच प्रेरित करत असते. शब्दांना आणि भावनांना संगीत सहज व सोपेपणे प्रकट करते. असाच मनाचा ठाव घेणाऱ्या 'दोन किनारे दोघे आपण' या म्युझिक अल्बमचे अनावरण प्रसिद्ध सतारवादक शेखर रानडे आणि साहित्यिक अरुण फडके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रभाकर गुणे, गीता गुणे, प्रणव हरिदास, रसिका गुणे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून कोणी फुले देते तर कोणी मिठाई देते. मात्र लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोने नवऱ्याला दिलेली अनोखी भेट म्हणजे ही ध्वनिफीत होय. गीता गुणे यांनी त्यांचे पती प्रभाकर गुणे यांची लिहलेली गीते त्यांच्या नकळतपणे त्यांनी ती संगीतबद्द करून त्यांची ध्वनिफीत तयार करून त्यांच्या वाढदिवसाला ही अनोखी भेट दिली आहे. या ध्वनिफीतमध्ये एकूण आठ गीते असून अभंग, गझल, भावगीत, लोकगीत, प्रेमगीत, जीवनगीत, युगलगीत अशा गीतांचा यात समावेश आहे. ही सर्व गीते प्रभाकर गुणे यांच्या लेखणीतून साकार झाली आहेत. संगीत प्रभाकर गुणे, प्रणव हरिदास, मैत्रेय - साहिल आणि ओंकार जांभेकर यांनी दिले आहे. तर गायक पं. संजीव चिम्मलगी, अभिषेक नलावडे, रचना मुळे, आदिती आमोणकर, गीता गुणे, अवंती बपोरीकर यांनी या गीतांना स्वरसाज दिला आहे. तर ध्वनिफीतीची निर्मिती गीता गुणे यांनी केली आहे. ही सर्व गीते रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील अशी आहेत, असा विश्वास गीत लेखक प्रभाकर गुणे यांनी व्यक्त केला.