दोस्त दोस्त ना रहा असं म्हणत अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याचं उत्तर ३ नोव्हेंबरला थिएटरमध्ये मिळणार आहे. त्यासाठी प्रथमेश आणि अभिनय या जोडीचा 'सिंगल' (Single movie) हा चित्रपट पहावा लागेल.
अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा एक धमाल चित्रपट असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय काय करामती करतो याची गंमत पहायला मिळणार आहे. पोरीपायी दोस्तीत कुस्ती होईल की प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा 'सिंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करेल असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करतात.
प्रथमेश आणि अभिनय व्यतिरिक्त या चित्रपटात रमेश परदेशी, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, सुरेश विश्वकर्मा या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.