मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सतत चर्चेत येत असतात. अभिनय क्षेत्रात इतक्या वर्षांचा वावर असतानाही ते लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. त्यांनी पुण्याजवळ निसर्गाच्या सानिध्यात एक फार्महाऊस बांधले आहे. मुंबईत नसतात तेव्हा ते तिथे असतात. चाहत्यांना जितके त्यांच्या या फार्महाऊसबद्दल कुतूहल वाटते, तेवढेच त्यांच्या सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींनाही. अनेक सेलिब्रिटी नानांच्या फार्महाऊला भेट देत असतात. नुकतेच मराठी सिनेइंडस्ट्रीतील खास मैत्रिणींनी त्यांच्या फार्महाउसला भेट दिली होती. या मैत्रिणी म्हणजे नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) आणि भारती आचरेकर (Bharti Acharekar).
नीना कुळकर्णी यांनी इंस्टाग्रामवर नाना पाटेकर यांच्या फार्म हाउसवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं. १९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो… विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता , हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.
त्यांनी पुढे म्हटले की, आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवारा चं अगत्य, नाना च्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.