Join us

राजकीय अन् अभिनयक्षेत्र सोडून डॉ. अमोल कोल्हे यांनी केली नव्या क्षेत्रात एन्ट्री? पाहा काय म्हणाले...

By शर्वरी जोशी | Published: March 24, 2022 7:28 PM

Dr. Amol Kolhe: अमोल कोल्हे यांनी अलिकडेच बाहुबली या गाजलेल्या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनसाठी त्यांचा आवाज डब केला.

अभिनयाप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही सक्रीयपणे सहभाग असलेले डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारून आणि जनसेवा करुन जनतेच्या मनात स्थान मिळवणारे अमोल कोल्हे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच त्यांनी बाहुबली या गाजलेल्या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनसाठी त्यांचा आवाज डब केला. यावेळचे त्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकारण आणि अभिनय क्षेत्राला रामराम करत डॉ. अमोल कोल्हे यांनी नवीन क्षेत्रामध्ये एन्ट्री केली की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, अमोल कोल्हे यांनी स्वत: 'लोकमत ऑनलाइन'शी बोलत असताना याविषयी खुलासा केला.

'बाहुबली' या चित्रपटाचं आतापर्यंत अनेक भाषांमध्ये डबिंग झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, पहिल्यांदाच मराठीमध्ये हा चित्रपट आणण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी पेललं. या प्रवासात त्यांना डॉ. अमोल कोल्हे यांची साथ मिळाली. या चित्रपटातील अमरेंद्र बाहुबली अर्थात प्रभासच्या भूमिकेला अमोल कोल्हे यांनी आवाज दिला आहे. या डबिंगविषयी आणि क्षेत्राविषयी त्यांनी त्यांचं मत मांडलं.

"बाहुबली'साठी डबिंग करताना खरंच खूप आनंद झाला. कारण, नवनवीन गोष्टी कायम आपण शिकत राहिल्या पाहिजेत. आणि, माझ्यासाठी हा सगळा अनुभव वेगळा होता. कारण, भाषांतरीत होत असलेल्या किंवा मुळातच स्वत:च्या आवाजाला सिनेमात डब करणं या गोष्टींपलिकडे मी कधीच डबिंग केलं नव्हतं. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवं क्षेत्र एक्सप्लोअर करायला मिळालं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "पण या प्रवासात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्रविण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार."

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी डबिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मात्र, या क्षेत्रासोबतच ते राजकीय क्षेत्र आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच सक्रीयरित्या कार्यरत राहणार आहेत. मात्र, या दोन क्षेत्रांपलिकडे जात आता त्यांनी डबिंगच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबाहुबली