रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा 'टिझर' नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदूद्वेष्टा, धर्मांध राजा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाने आपल्या अमानुष अत्याचाराने रयतेला घाबरून सोडले होते. या टीझरमध्ये औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री पहायला मिळते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो..!” अशा कडक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुनावले. सह्याद्रीच्या ‘नरसिंहाची ही शिवगर्जना’ प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या या टीझर मधून पहायला मिळते आहे.
सर्वांच्या अंगावर काटा आणणारा हा टीझर असून औरंगजेबाचा कपटी अवतार आणि छत्रपती महाराजांचा धैर्यशील बाणा यात पहायला मिळतो आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघलशासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवार ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.