Join us

50 Years Of Pinjara : ‘पिंजरा’ची पन्नाशी! चित्रपटाच्या जाहिरातीसाठी व्ही शांताराम यांनी लढवली होती नामी शक्कल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 4:21 PM

50 Years Of Pinjara : 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आज 50 वर्ष पूर्ण केली आहेत.

50 Years Of Pinjara : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी.. कशी नशीबानं थट्टा आज मांडली... मला लागली कुणाची उचकी... अशी सदाबहार गाणी, व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन आणि श्रीराम लागू  (Dr. Shreeram Lagoo), निळू फुले (Nilu Phule) , अभिनेत्री संध्या  (Sandhya) यांचा दमदार अभिनय असा त्रिवेणी संगम असलेला ‘पिंजरा’ ( Pinjara ) हा एक अजरामर मराठी सिनेमा. हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला रंगीत तमाशाप्रधान सिनेमा मैलाचा दगड ठरला.

1972 साली आजच्याच दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज याला 50 वर्षे पूर्ण झालीत. पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनीया चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं. इतकं की, तत्कालीन बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांपेक्षाही ‘पिंजरा’ने अधिक कमाई केली. अर्थात त्यामागे ‘पिंजरा’चं हटके प्रमोशन हेही एक कारण होतं.

होय, दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्याकाळी ‘पिंजरा’चं हटके प्रमोशन केलं होतं. हातात अपुरा वेळ होता शिवाय पैसाही अपुरा होता. त्यामुळे ‘पिंजरा’ची जाहिरातबाजी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे व्ही शांतराम यांनी एक नामी युक्ती शोधून काढली होती. त्यांनी काय केलं तर  पुण्यातील रिक्षांची निवड केली. रिक्षावर ‘पिंजरा’चं कुठलंही पोस्टर, फोटो न चिपकवता त्यांनी केवळ त्यावर ‘पिंजरा’ असा एकच शब्द लिहिला. व्ही शांताराम यांची ही युक्ती कामी आली. हे पिंजरा प्रकरण नक्की आहे तरी काय ? असं कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं आणि 31 मार्च 1972 रोजी लोकांना त्याचं उत्तर लोकांना मिळालं. याचदिवशी ‘पिंजरा’ प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तुडूंब गर्दी केली. चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. चित्रपटाची गाणीही हिट झालीत.

‘पिंजरा’ हा चित्रपट बनवण्यासाठी 20 लाख खर्च आला होता. हा पैसा काहीच दिवसांत वसूल झाला. अगदी या चित्रपटाची तिकिटं ब्लॅकने विकणारेही या चित्रपटामुळे श्रीमंत झालेत, असं म्हणतात ते म्हणूनच. 

श्रीराम लागू यांचा पदार्पणातील हा पहिलाच मराठी चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पुण्यात तब्बल 134 आठवडे हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये ठाण मांडून होता. 1973 साली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं.  

टॅग्स :श्रीराम लागूसिनेमा