पिंपरी: महापालिकेने तब्बल ८० कोटी रुपये खर्च करून उभारलेले नाट्यगृह रंगकर्मीसाठी केवळ पांढरा हत्ती ठरल्याच आता स्पष्ट झालाय. कारण, या नाट्यगृहाच्या उभारणीत अनेक त्रुटी असून इथे नाटकांचे प्रयोग होऊच शकत नाही, असे परखड मत आखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, जेष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी आज चिंचवड येथे व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाचे बिगुल वाजले असून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून शहरामध्ये तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. गुरुवारी चिंचवडगाव, मोरया गोसावी क्रीडा संकुल, काकडे पार्क, चिंचवड येथे भूमीपूजन व मंडपपूजन समारंभ झाला. मंगलमूर्तीवाड्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले व उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते आरती केली. त्यांनतर उपस्थित मान्यवर मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे पोहोचले. त्याठिकाणी भूमी पूजन व मंडपं पूजन झाले.
यावेळी प्रशांत दामले, भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,राजेशकुमार साकला, कृष्णकुमार गोयल, राजेश जैन, राजेंद्र शिंदे, नाट्य परिषद बारामती शाखा अध्यक्ष किरण गुजर, तळेगाव शाखा अध्यक्ष सुरेश धोत्रे, नेपथ्यकार शाम भूतकर, नियामक मंडळ सदस्य समीर हम्पी, सत्यजित धांडेकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे तसेच नाट्यकर्मी उपस्थित होते.
प्रशांत दामले म्हणाले, नाट्यगृह उभारणीचे काही गणिते असतात ती चुकली की केवळ खर्च वाढतो आणि हा प्रकार पिंपरी चिंचवड महापालिकेनं उभारलेल्या या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या बाबतीत घडला आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी पिंपरी चिंचवड शाखेला मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. सोहळ्याची तयारी सुरू झालेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कलावंत तसेच रसिक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या सहभागाने हे संमेलन होत आहे.