संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये मंगळवारी(१६ एप्रिल) मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते. तीव्र वादळामुळे दुबई विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली होती. मोठा पूर आल्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. दुबईतील या पूरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दुबईतील ही परिस्थिती पाहून मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भावुक झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत दुबईसाठी प्रार्थना केली आहे. दुबईतील बुर्ज खलिफाचा फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सोनाली म्हणते, "सॉरी दुबई...तुम्ही यातून बाहेर पडाल अशी आशा आहे." सोनालीची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. दरम्यान, दुबई हे सोनाली कुलकर्णीचं सासर आहे. सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईत असतो. लग्नानंतर सोनालीही काही काळासाठी दुबईला गेली होती. आताही अधून मधून सोनाली दुबईला असते.
दुबईत मंगळवारी संध्याकाळपर्यंत, १२० मिलिमीटर पाऊस झाला. इतका पाऊस येथे एका वर्षात पडतो. पावसामुळे यूएईमधील शाळाही बंद होत्या आणि सरकारी कर्मचारी घरून काम करत होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.