Join us

‘डबिंग’ झुकेगा नहीं साला...! वरदान ठरतेय डबिंगची जादुई कला...!!

By संजय घावरे | Published: December 04, 2022 5:29 PM

 ‘मैं झुकेगा नहीं साला....’ या डायलॉगने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजनाही अक्षरश: वेड लावत डबिंगच्या दुनियेची जादू संपूर्ण जगाला दाखवली...

 ‘मैं झुकेगा नहीं साला....’ या डायलॉगने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजनाही अक्षरश: वेड लावत डबिंगच्या दुनियेची जादू संपूर्ण जगाला दाखवली. आज मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम या प्रादेषिक चित्रपटांपासून हॉलिवूडपटांपर्यंत बरेच चित्रपट डब होत आहेत. रिमेकपेक्षा डबिंग निर्मात्यांसाठी फायद्याचा ठरत आहे, पण या चित्रपटांचे प्रमाण वाढल्याने डबिंगची बाराखडी माहित नसलेलेही डब करत असल्याचा धोकाही या क्षेत्राला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटामागोमाग निर्माते प्रसाद मंगेश यांचा  ‘सूर्या’ आणि भाऊसाहेब शिंदेच्या ‘रौंदळ’सह काही चित्रपट मराठीसोबतच हिंदीतही डब करून रिलीज होणार आहेत. हिंदीत डब करण्यासाठी हॉलिवूडपटांच्या जोडीला दक्षिणेकडील चित्रपटांची कायम रांग लागलेली असते. लघुपटांसोबतच माहितीपट, जाहिराती, कार्टुन आणि अ‍ॅनिमेशन फिल्म्सच्या डबिंगचे कामही असते. एखादा चित्रपट इतर भाषेत डब करायचा असल्यास प्रथम संवादांचे भाषांतर करावे लागते. मूळ चित्रपटातील दृश्यांप्रमाणे लिप्सिंगसाठी योग्य शब्दांची निवड लेखकाला करावी लागते. कित्येकदा मूळ संवाद चपखल बसत नसेल तर थोडा बदलही करावा लागतो. मुख्य आव्हान गाण्यांचे असते. म्युझिक ट्रॅक्स तेच ठेवून केवळ शब्दरचना करायची असल्यास गीतकार आणि गायकाचा खर्च होतो, पण ‘बाहुबली’ मराठीसारखी संपूर्ण गाणीच मराठी गीत-संगीताने सजवण्यासाठी लाखोंचा खर्च होतो. यावर बोलताना निर्माते प्रसाद मंगेश म्हणाले की, इतर भाषेत डबसाठी पाच-सहा लाख रुपये खर्च होतात. प्रोफेशनल डबिंग आर्टिस्ट खर्चिक असतो, पण काम चांगले होते. नॉर्मल डबिंग आर्टिस्ट कमी खर्चात काम करतो, पण अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. डबिंग आर्टिस्टही कलाकारांसारखे मानधन मागतात. कारण त्यांना तिथे अभिनयही करावा लागतो. पॅन इंडिया चित्रपट करताना खर्चाची बाजू दुय्यम बनते आणि चांगलेच डबिंग आर्टिस्ट घ्यावे लागतात असेही प्रसाद म्हणाले.

रेट्स खूप घसरलेत...पूर्वी साऊथच्या चित्रपटातील नायकासाठी १ लाखांपासून ३ लाखांपर्यंत मिळायचे, पण आता २००००-२५००० रुपयांवर आले. ओटीटी-सॅटेलाईटसाठी नायकाच्या डबिंगसाठी ५००० ते १२००० रुपयांपर्यंत देतात. त्यापेक्षा कमी नायिकेसाठी आणि त्याहीपेक्षा कमी इतर कलाकारांसाठी दिले जातात. क्राऊड डबिंगसाठी नॉर्मल रेट २००० रुपये आहे, पण काही ठिकाणी ४०० ते ६०० रुपयेही दिले जातात.  ..........................

 

- गणेश दिवेकर (अभिनेता, अध्यक्ष - असोसिएशन ऑफ व्हॉईस आर्टिस्ट)बऱ्याचदा प्रस्थापित डबिंग आर्टिस्टचे बजेट परवडत नसल्याने नवोदितांसोबत काम चालवून घेतले जाते. डबिंगचे प्रमाण वाढल्याने कामाची व्याप्ती वाढली ही चांगली गोष्ट असली तरी नवीन येणाऱ्या मुलांनी ही कला शिकायला हवी. केवळ पैसे मिळतात म्हणून डबिंगकडे वळता कामा नये. थिएटरसाठी, सॅटेलाईटसाठी, ओटीटीसाठी, युट्यूबसाठी अशाप्रकारे सिनेमांची विभागणी करण्यात आली आहे. ............................

- मेघना एरंडे (अभिनेत्री, डबिंग आर्टिस्ट)इंडस्ट्रीची वाढत असल्याने सिनियर व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून खूप आनंदी आहे. पूर्वी फार महत्त्व नसलेली ही इंडस्ट्री मुख्य प्रवाहात आली आहे. ओटीटीमुळे काम वाढले आहे. डबिंगकडे पार्ट टाईम जॉब म्हणून न पाहता गांभीर्याने पाहण्याची आणि या फिल्डला रिस्पेक्ट देणे खूप गरजेचे आहे. नवीन कलाकार येत असले तरी प्रतिथयश कलाकारांनी स्वत:ला असुरक्षित समजता कामा नये..................................

फायदे आणि तोटेनवीन डबिंग आर्टिस्टसाठी सध्याचे वातावरण फायद्याचे आहे, पण फ्री ओटीटीमुळे डबिंगचा स्तर खालावला आहे. आर्टिस्टचे दरही घसरले आहेत. ५०० रुपयांमध्ये पूर्ण एपिसोड डब करणारेही नवोदित आर्टिस्ट आहेत. दरमहा पगारावरही आर्टिस्ट नेमले जात आहेत. डबिंग ही एक कला आहे, जी आता मजूरी पद्धतीने केली जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. नवीन आर्टिस्टमध्ये ७० टक्के नोकरी नसल्याने आणि आवाज चांगला असल्याने या क्षेत्राकडे वळत आहेत. डबिंग क्लासेसची संख्या वाढली आहे. तिथे फक्त बोलायला शिकवले जाते, पण त्या जोडीला अभिनयही महत्त्वाचा असतो.

डबिंग आर्टिस्ट बनण्यासाठी...अभिनयाचे अंगही असावे लागते. भाषा शुद्ध, भाषेवर प्रभुत्व, उच्चार स्पष्ट आणि वाणी निर्दोष हवी. आज बेस आवाज असलेलाच डबिंग आर्टिस्ट बनू शकतो असे काही राहिलेले नाही.

टॅग्स :सिनेमा