'जजमेंट' या थरारक चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचपाठोपाठ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २० सेकंदाच्या या टिझरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक पाहायला मिळते. 'माझ्या जीवाला धोका आहे इथे', रडवेल्या आवाजात ऐकू येणारा हा संवाद आणि मंगेश देसाई यांचे कधीही न पाहिलेले रूप चित्रपटाबद्दलचे कुतूहल अधिकच वाढवत आहेत. शिवाय या चित्रपटामध्ये मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका साकारत असल्यामुळे त्याच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे.
तसेच समाजातील काही नकारात्मक बाबीही त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतील. माणसांमध्ये इतकी विकृती असू शकते, याचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या भूमिकेविषयी मंगेश देसाईने सांगितले की, खरंतर एक कलाकार म्हणून आम्ही 'स्विच ऑन, स्विच ऑफ' पटकन होतो. परंतु हा चित्रपट त्याला अपवाद आहे. ही व्यक्तिरेखा मला शूटिंगनंतरही विचार करण्यास प्रवृत्त करायची. मुळात वैयक्तिक आयुष्यात मी असा अजिबात नाही. तरीही एक अभिनेता म्हणून मी 'या' भूमिकेला माझ्याकडून पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला.
तेजश्रीची भूमिकाही तितक्याच ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे, ही पर्वणीच ठरणार आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे. या चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे.