Join us

शफी इनामदार यांच्या निधनानंतर चारच वर्षांत त्यांची पत्नी अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे झाले होते निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:48 AM

ती फुलराणी आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच झाले होते. त्यांनी ती फुलराणी या नाटकात साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः ...

ती फुलराणी आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच झाले होते. त्यांनी ती फुलराणी या नाटकात साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले होते. भक्ती बर्वे यांच्यानंतर अमृता सुभाष, हेमांगी कवी यांसारख्या अभिनेत्रींनी ती फुलराणीची भूमिका साकारली. पण भक्ती बर्वे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यांनी केवळ मराठी मध्येच नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत देखील काम केले. जाने भी दो यारो या प्रसिद्ध चित्रपटातदेखील त्यांनी नसिरुद्दीन शहा, सतिश शहा, रवी बासवानी यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. भक्ती बर्वे यांचे निधन केवळ वयाच्या ५२ व्या वर्षी झाले. १२ फेब्रुवारी २००१ रोजी वाई येथून मुंबईला परतताना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या केवळ चार वर्षं आधी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. भक्ती बर्वे यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेते शफी इनामदार यांच्यासोबत झाले होते. शफी इनामदार यांनी अर्ध सत्य, सागर, क्रांतिवीर, अकेले हम अकेल तुम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. ये जो है जिंदगी, तेरी भी चूप मेरी भी चूप यांसारख्या त्यांच्या मालिका देखील प्रचंड गाजल्या होत्या. तेरी भी चूप मेरी भी चूप ही मालिका सुरू असतानाच त्यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यावेळी ते केवळ ५२ वर्षांचे होते. भक्ती बर्वे यांचा जन्म सांगली येथे झाला. शाळेत असतानाच सुधा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत त्या बालनाटकांमध्ये काम करू लागल्या. त्यांनी निवेदिका म्हणून ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केले. त्यानंतर त्या मुंबई दूरदर्शनला बातम्या देत असत. अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.