७० ते ८०च्या दशकात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी रसिकांवर भुरळ पाडली होती. त्यांनी खूप कमी वयात अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण फार कमी वयात त्यांचं निधन झाले. त्यांचे शेवटचे दिवस फारच वेदनादायक होते. एका अपघातानंतर होत्याचे नव्हते झाले होते.
अभिनेत्री रंजना यांनी व्ही. शांताराम निर्मित आणि किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. रंजना यांना अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. रंजना या प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या लेक होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यांनी लहान वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटानंतर व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. त्यांना ऐंशीच्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री मानले जायचे. त्यांच्या अभिनयावर, सौंदर्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा होते. अनेक नायिकाप्रधान सिनेमात त्यांनी काम केले. परंतु एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.
१९८७ साली झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रंजना बंगळुरूला जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. हा अपघात घडला, त्यावेळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काही झाले नाही. हा अपघात घडला त्यावेळी रंजना ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर अनेक वर्षे व्हीलचेअरवरच होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षे व्हीलचेअरवर काढली. २००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षे आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली.