दिग्दर्शक व निर्माता संजय जाधवचा 'दुनियादारी' चित्रपट 19 जुलै, 2013ला प्रदर्शित झाला. या चित्रपटातील शिरीन, श्रेयस (बच्चू) , दिगंबर (दिग्या), मिनाक्षी (मीनू), साईनाथ (साई) या मित्रांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. 'दुनियादारी' सिनेमाने मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करणा-या ह्या आयकॉनिक मराठी सिनेमाने नुकतीच पाच वर्ष पूर्ण केली आहेत.'दुनियादारी' चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केले. सिनेमाचे प्रस्तुतकर्ता नानुभाई जयसिंघानी, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता अंकुश चौधरी, सुशांत शेलार, संगीत दिग्दर्शक पंकज पडघन, अमितराज, गायक रोहित राऊत, दिपक राणे ह्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले. यावेळी सई ताम्हणकर खूपच भावूक झाली होती. सई म्हणाली, 'मला आठवते आहे की याचवेळी पाच वर्षांपूर्वी सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागले होते. हा सिनेमा माझ्यासाठी अत्यंत खास आहे. 'दुनियादारी'मूळे आम्हा सर्वच कलाकारांची आयुष्ये कायमची बदलली. 'दुनियादारी' सिनेमाने मला फक्त पैसा आणि प्रसिध्दीच नाही दिली, तर आयुष्यभरासाठी साथ देतील, अशी जीवाभावाची माणसे दिली. त्यामूळेच 19 जुलै हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक कलाकाराला असा दिवस देवाने नक्की दाखवावा.' दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ' हा चित्रपट बनवताना तो प्रेक्षकांना आवडेल असा आम्हांला विश्वास होता. पण 'दुनियादारी' सिनेमा मराठी सिनेसृष्टीतले त्याअगोदरचे सर्व रेकॉर्ड तोडेल, असे वाटले नव्हते. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या या प्रेमाची उतराई करणे अशक्यच आहे. असेच प्रेम यंदा रिलीज होणाऱ्या आमच्या 'लकी' सिनेमालाही मिळावे, अशी अपेक्षा आहे.'
'दुनियादारी'ला झाली पाच वर्ष पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:04 PM
सेलिब्रेशन करताना सई ताम्हणकर झाली भावूक!
ठळक मुद्दे'दुनियादारी' सिनेमाने बदलली मराठी चित्रपटांची परिभाषा 'दुनियादारी'ने केले होते बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन