राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असतानाच, रविवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने भाजपा-शिवसेना युतीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या रूपाने राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. दरम्यान आता राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव चित्रपटसेनेच्या लोगोचे अनावरण पार पडले.
शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अक्षया देवधर, माधव देवचाके, आदिती सारंगधर, हार्दिक जोशी इत्यादी कलाकारांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कलाकारांसाठी खूप प्रामाणिकपणे काम करु
यावेळी हार्दिक जोशी म्हणाला की, कलाकार म्हणून आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतच होतो. त्याच प्रामाणिकतेसोबत आम्ही कलाकारांसाठी काम करणार आहोत. प्रेक्षकांसाठी देखील करुच. माध्यमाची गरज असते. मला वाटते याच्यापेक्षा उत्तम माध्यम काय असेल तर ते शिंदे साहेब असतील. सुशांत शेलार दादा सोबत आहेत. मी लहानपणापासून हे कलाकार कसे घडले, हे बघत आलो आहे. अदिती ताईदेखील बरोबर होती. एवढे मोठेमोठे कलाकार बरोबर असताना तसेच शिंदे साहेबांचं मार्गदर्शन खूप कामी येणार आहे. चित्रपट सेना जी स्थापन केली आहे, त्यातून कलाकारांसाठी खूप प्रामाणिकपणे काम करु.