'एक होतं पाणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम जोरदार सुरू आहे. न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज निर्मित 'एक होतं पाणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत बालकलाकार चैत्रा भुजबळ दिसणार आहे. नुकतेच तिचे डबिंग उत्साहात पार पडले. त्यावेळी बालकलाकार चैत्रा सोबत लेखक आशिष निनगुरकर दिसत आहेत. चैत्राने अभिनेते गणेश मयेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
'एक होतं पाणी' सिनेमात चैत्राने उषा नामक मुलीची भूमिका साकारली आहे. ज्या मुलीला गावाच्या बाहेरून पाणी आणावे लागते, त्यामुळे तिला शाळेत जाता येत नाही. त्यामुळे तिची शाळा बुडते. याअगोदर चैत्राने माझी तपस्या या चित्रपटात काम केले होते व तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता,पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. आशिष निनगुरकर लिखित या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर,रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ.राजू पाटोदकर, वर्षा पाटणकर,राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ या कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.