महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून 'एक राधा एक मीरा' चित्रपटाकडे पाहिलं जातंय. मराठीतील ‘बिग बजेट’ चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपटाचा आज ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलरमध्ये गश्मीर-मृण्मयीच्या रोमँटिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलंय. आज कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत 'एक राधा एक मीरा'चा ट्रेलर लाँच झाला.
'एक राधा एक मीरा'चा ट्रेलर
निसर्गरम्य वातावरणात 'एक राधा एक मीरा'चं शूटिंग झालेलं दिसतंय. ट्रेलरमध्ये गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ट्रेलर पाहून गश्मीर महाजनीचा डबल रोल आहे का, अशी चर्चा निर्माण झालीय. ट्रेलरच्या शेवटी मृण्मयी आणि गश्मीर यांच्यातली रोमँटिक केमिस्ट्रीही पाहायला मिळतेय. अल्पावधीत या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय.
'एक राधा एक मीरा' कधी रिलीज होणार?
‘एक राधा एक मीरा’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांच्या फौजेने चित्रपटाचे पार्श्वगायन केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर, म्युझिकल लव्ह स्टोरी," अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.