रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा चित्रपट येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. अलीकडेच आयोजित करण्यात आलेला 'एक होतं पाणी' चित्रपटाचा संगीत अनावरण तसेच ट्रेलर लॉन्च सोहळा अभिनेत्री वर्षा उसगांवकरच्या उपस्थित पार पडला.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून वर्षा उसगांवकर म्हणाल्या,''पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटांतून होणारं प्रबोधन हे मोठ्या स्तरावर होत असतं त्यामुळे असे विषय सातत्याने येत राहावेत.'' तसेच निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाचे विशेष कौतुक करत चित्रपटाच्या ह्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'बोभाटा', 'भान राहील', 'चला चला', आणि 'एक होतं पाणी' अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत हेते.
एक होता राजा.. एक होती राणी आता म्हणू नका 'एक होतं पाणी' अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे. दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'एक होतं पाणी' हा चित्रपट आहे. ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे... प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये... पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण... याचा उहापोह 'एक होतं पाणी' करतं. एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती निर्माण करेल असा निर्माते-दिग्दर्शकांचा विश्वास आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश 'एक होतं पाणी' अधोरेखित करतो. 'पाणी अडवा पाणी जिरवा'ची सध्या नितांत गरज असून 'एक होतं पाणी' म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल. या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग,यतीन कार्येकर, जयराज नायर, गणेश मयेकर,दिपज्योती नाईक, रणजित जोग, श्रिया मस्तेकर,बालकलाकार चैत्रा भुजबळ, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे,वर्षा पाटणकर,कांचन दोडे, यासीर सय्यद,संदीप पाटील आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील.