मूळ स्वीडनची असलेली अभिनेत्री एली अवराम (Elli Avrram) 'इलू इलू' या सिनेमातून मराठीत पदार्पण करत आहे. या सिनेमात तिने शाळेतील इंग्रजी शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि एलीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच सिनेमाचा प्रीमिअर पार पडला. या प्रीमिअरला अभिनेता आमिर खाननेही हजेरी लावली होती. दरम्यान सर्वांच्या नजरा एलीच्या आईवर खिळल्या होत्या. सुंदर साडी परिधान करुन त्या लेकीच्या सिनेमाच्या प्रीमिअरला आल्या होत्या.
एली अवरामने 'मिकी व्हायरस' सिनेमातून बॉॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर ती काही हिंदी सिनेमांमध्ये दिसली. बिग बॉसमध्येही तिने सहभाग घेतला होता. एली काही वर्षांपूर्वीच भारतात आली आहे. मात्र तरी ती आता चांगलं हिंदी बोलते. हे पाहूनच दिग्दर्शक अजिंक्य फाळकेने तिला 'इलू इलू' सिनेमात घेतलं. कालच सिनेमाचा प्रीमिअर पार पडला. सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सर्वांनीच स्क्रीनिंगला हजेरी लावली. एलीच्या सौंदर्याची स्तुती तर करावी तितकी कमीच आहे. लाल गाऊनमध्ये ती आली होती. एलीचं हे सौंदर्य खरंतर तिच्या आईकडूनच तिच्यात आलं आहे. प्रीमिअरला एलीची आई मारिया या चक्क साडी नेसून आल्या होत्या. गुलाबी रंगाची काठापदराची साडी, केसांची वेणी अशा अगदी मराठमोळ्या लूकमध्ये त्यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हे पाहून कमेंट्स मध्ये तर नेटकऱ्यांनी एलीच्या आईच्याच सौंदर्याची खूप स्तुती केली. मराठी सिनेमा आहे म्हणून त्या अगदी शोभेल असाच लूक करुन आलेल्या दिसल्या. मारिया या ६४ वर्षांच्या आहेत मात्र आपल्या सौंदर्याने अगदी तरुणींनाही मात देत आहेत.
'इलू इलू' सिनेमा ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये एली अवरामसोबतच मीरा जगन्नाथ, अंकिता लांडे, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत यांचीही भूमिका आहे. बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. अजिंक्य फाळके या तरुणाने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरेंनीही सिनेमात त्यांचा आवाज दिला आहे. शिवाय काही कविताही लिहिल्या आहेत.