Join us

भावनाप्रधान अॅक्शनपट मराठी चित्रपट ‘रक्त’चा मुहूर्त संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:11 PM

एक आई दहा मुलांची काळजी घेऊ शकते, पण दहा मुले मिळून एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत, अशी रक्त या चित्रपटाची वनलाईन आहे. या चित्रपटाचा नायक विश्वास म्हात्रे असून नाना पाटेकर त्याचे आदर्श आहेत.

निर्माता चिंटू सिंह आणि दिग्दर्शक पायल लोही यांच्या मराठी चित्रपट ‘रक्त’चा शानदार मुहूर्त नुकताच मुंबईत संपन्न झाला. ‘रक्त’ हा एक भावनाप्रधान अॅक्शनपट आहे. या चित्रपटात आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक आई दहा मुलांची काळजी घेऊ शकते, पण दहा मुले मिळून एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत, अशी या चित्रपटाची वनलाईन आहे. या चित्रपटाचा नायक विश्वास म्हात्रे असून नाना पाटेकर त्याचे आदर्श आहेत. गौरी वानखडे या चित्रपटाची नायिका असून तिची ऑडिशनच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.

निर्माते चिंटू सिंह या चित्रपटाबद्दल विशेष उत्साही असून एक भावनिक आणि प्रेक्षकांना आपलासा वाटेल, त्यांचे मनोरंजन करू शकेल असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहोत असे ते सांगतात. दाक्षिणात्य पद्धतीची अॅक्शन असलेला चित्रपट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्यावर सध्या चित्रपटाची टीम चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला असून या चित्रपटाचे चित्रीकरण रत्नागिरी आणि गोव्यात होणार आहे.

चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका पायल लोही यांनीही मराठीत चित्रपट करणे हे आमचे भाग्य असून या चित्रपटाची कथाच स्टार असून नवोदितांच्या प्रेमावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

रक्त असे या चित्रपटाचे नाव असल्याने हा चित्रपट रक्ताच्या नात्याशी संबंधीत असणार तसाच एक भावनिक चित्रपट असणार हे प्रेक्षकांच्या लगेचच लक्षात येत आहे. आपले आई-वडील आपल्यासाठी आयुष्याभर अनेक गोष्टी करतात. पण त्यांच्या उतारवयात मुलांना त्यांचा विसर पडतो. मुले त्यांचा सांभाळ करत नाहीत. काहींना तर त्यांची मुले घराच्या बाहेर देखील काढतात. वृद्धपकाळात रस्त्यावर राहाण्याची वेळ त्यांच्यावर येते. आपल्या आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलाची कथा प्रेक्षकांना रक्त या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.