'दुनियादारी', 'मितवा' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. उत्तम अभिनयशैली आणि गुड लुकिंगच्या जोरावर आज तो चॉकलेट बॉय म्हणून ओळखला. जातो. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर स्वप्नीलची पावलं छोट्या पडद्याकडे वळली आहेत. त्यामुळेच सध्या तो तू तेव्हा तशी या मालिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने त्याने त्याच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात तो अजूनही खर्चासाठी आई-वडिलांकडून पैसे घेतो असं त्याने सांगितलं.
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाच्या मंचावर लवकरच तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकार हजेरी लावणार आहेत. यावेळी अभिज्ञा भावे, शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी ही कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. सध्या या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये स्वप्नील जोशी त्याच्या कमाईचं काय करतो हे सांगताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला स्वप्नील जोशी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. स्वप्नील एका भागासाठी ७० ते ७५ हजार रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे स्वप्नीलने कमवलेली प्रत्येक रक्कम तो आई-वडिलांकडे सुपूर्द करतो आणि त्याला गरज असेल तेव्हा त्यांच्याकडून मागून घेतो, असं त्याने या मंचावर सांगितलं.
दरम्यान, 'तू खर्च करतोस का?' असा प्रश्न स्वप्नीलला विचारण्यात आला. त्यावेळी "ही गोष्ट पूर्णत: खोटी आहे. माझ्या आई-वडिलांनी मला पैसे खर्च करण्याबाबत काही शिकवण दिली आहे. त्यामुळे आजही मी माझी सर्व कमाई आई-वडिलांकडे देतो", असं स्वप्नील म्हणाला. तसंच दर महिन्याला गरजेनुसार, ते स्वप्नीलला खर्चासाठी पैसे काढून देतात, असंही त्याने सांगितलं.