अभिनेता भरत जाधव ( Bharat Jadhav) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. त्याची अनेक नाटक लोकप्रिय ठरली आहेत. त्यातीलच एक नाटक म्हणजे मोरुची मावशी. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनी गाजवलेलं हे नाटक भरत त्याच ताकदीनं रंगवतो आहे. या नाटकातील 'टांग टिंग टिंगा' हे गाणं आणि त्यावर केलेला नाच हा नाटकाचा महत्त्वाचा भाग होता. दरम्यान एका मुलाखतीत भरत जाधवनेविजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भरत जाधवने अमोल परचुरे यांच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीत त्याने दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मोरुची मावशी किंवा दामोदरपंत या नाटकाच्या प्रयोगावेळी तो विजय चव्हाण यांचा फोटो देवाच्या बाजूला ठेवून त्यांना नेहमी आदरांजली वाहतो. याबद्दलही त्याने मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला की, विजू मामांना मी नेहमीच मिस करतो. आमचा पूर्ण ग्रुप मिस करतो. आजही मी मोरुची मावशी किंवा दामोदरपंतचा शो असेल तर नाटकाचा देव्हारा असतो ना त्याच्या बाजूला विजू मामांचा फोटो असतोच आणि त्याला आदरांजली देऊनच आम्ही त्या नाटकाचे प्रयोग करतो.
'''टांग टिंग टिंगाक' विजू मामांशिवाय दुसरं कोणी चांगलं करू शकत नाही''भरत जाधव पुढे म्हणाला की, दामोदरपंतचे प्रयोग देखील शो संपल्यानंतरही लोकांना मी सांगतो की टाळ्या विजय चव्हाणांसाठी देऊया. अरे गरजेचं आहे ते. मोरुची मावशीचं जेव्हा टांग टिंग टिंगाकला वन्स मोअर येतो मला तेव्हा थांबतो मी आणि एकदा टाळ्या विजय मामांसाठी देऊया असं सांगतो. कारण टांग टिंग टिंगाक विजू मामांशिवाय दुसरं कोणी चांगलं करू शकत नाही. मी फक्त ते पुढे नेतोय. बाकी फार काही करत नाही आणि अत्र्यांचं लिखाण आहे हो... हे लिखाण आहे. अशी भाषा बोलणं, त्या पद्धतीचा विनोद. अंडर द बेल्ट काहीच विनोद नाहीयेत.