यश मिळाल्यानंतर माणूस जमिनीवर राहिला तरच इतर लोक त्याचा आदर करतात. मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकारांबद्दल ते नखरे करतात म्हणून त्यांची ओळख आहे.प्रसिद्ध आयोजक स्वप्निल रास्ते (Swapnil Raste) यांनाही अनेकदा कलाकारांचा असा अनुभव आला आहे. नुकतंच त्यांनी कलाकारांना जमिनीवर रहा की असं आवाहन केलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
कोणताही कार्यक्रम, समारंभ असो अनेकदा कलाकारांना आमंत्रित केलं जातं. तसंच कोणत्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना बोलवायचं, त्यांच्या तारखांचं गणित जुळतंय का हे पाहावं लागतं. तर दुसरीकडे हे सेलिब्रिटी मात्र आयोजकांसमोर अनेक अटी मांडतात. जसं की मला या या वेळेतच फ्री करा, माझ्यासाठी व्हॅनिटी व्हॅन ठेवा, पिक ड्रॉप द्या अशा अनेक अटी कलाकारांच्या असतात. यावर स्वप्निल रास्ते यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले,'कार्यक्रम पत्रिका छापून आल्यावर मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर कॅन्सल करु. बरं! मीही क्लाएंट आहे तुझा. माझ्या अटींचं काय? बरं, ह्या अटी आधी का नाही नमूद केल्या? कलाकार मित्रांनो, प्रत्येकाचा काळ हा मर्यादितच असतो. रहा की जमिनीवर आणि करा की काम. अमर्यादित काळ मनात घर करुन राहाल, एक माणूस म्हणून सुद्धा!'