केदार शिंदे अभिनेता, दिग्दर्शक
गणेशोत्सवाचे तेव्हाचे रूप आणि आजचे रूप यात मोठा फरक पडला आहे. तो आज एक इव्हेंट झाला आहे. मुळात जे काही या संबंधात घडले आहे आणि आज घडत आहे, ते तात्कालिक आहे, ते बदलणारे आहे, कायम राहाणारे नाही, हे ही खरे आहे. गणेशोत्सवाचे आजचे स्वरूपही तसेच आहे. ते पूर्वी होते ते आत्ता नाही, ते बदलले आहे आणि ते पुढेही बदलेल, पण हे सारे बदल आपण सकारात्मकपणे घेतो. तसे त्याकडे पाहतो.
गिरणगाव, गिरगाव, दादर आदी विविध ठिकाणी गणेशोत्सव हा पूर्वी उत्सव होता. चाळीतील सारे जण त्यात गुंतलेले असत. नाटक, एकांकिका यासारखे कार्यक्रम व्हायचे. रहिवासीच ते सर्व धडपडून सादर करत असत. नाटकाच्या तालमी होत, त्यातून नवनवे प्रयोगही होत. यातून अनेक जण चित्रपट-नाट्यक्षेत्रात, गायन क्षेत्रातही नावाजले. गायन-वादन असो वा नकला त्यातही असे सादरीकरण होई. त्यातूनही अनेकांना प्रोत्साहन मिळाले आणि ते पुढे आपापल्या क्षेत्रात पुढेही आले. गणेशोत्सवाने त्यांना त्यावेळी कलेला सादर करण्यासाठी दिलेली ती संधी होती. त्यावेळी आजच्यासारखे सोशल मीडियातील विविध प्रकारही नव्हते. त्यामुळे या प्रकारच्या गणेशोत्सवातील सादरीकरणाचाच पर्याय तेव्हा होता. फार स्पर्धाही नव्हत्या, आज तसे नाही. स्पर्धाही वाढलेल्या आहेत, त्यातूनही कलाकारांना संधी मिळत असते. तर सोशल मीडियामध्ये असलेल्या यू ट्यूब, रील, पॉडकास्ट यासारख्या प्रकारामुळे आपल्या अंगभूत गुणांना अनेक जण सादर करत आहेत. ते एक धाडस असते, ते करताना ते मेहनत घेतात, त्यासाठी शिकतात आणि त्यातून पैसेही कमावतात. इतकेच नव्हे तर त्यातून त्यांना संधीही मिळत असते, ही सकारात्मक बाब आहे.
केवळ गणेशोत्सवामधून पूर्वी होणारी नाटके, एकांकिका आदी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आज होत नाहीत. वेळेचे बंधन टाकल्यामुळे काही वर्षांपासून गणेशोत्सवाचे स्वरूपच बदलले आहे. नोकरी-कामधंद्यामुळे लोकांचे जीवन व शहराचे रूपही बदलल्याने त्यावर परिणाम झाला. मात्र, त्यातही सोशल मीडियाच्या उगमामुळे मोठी संधी नवीन पिढीला मिळाली आणि या नव्या पिढीने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यामुळे गणपती उत्सवातून आता नवे कलाकार निर्माण होत नाहीत, ही खंत जरी असली, तरी उत्सवाचे बदललेले रूप आणि उपलब्ध झालेल्या या नव्या काळातील संधी यांचा विचार करता, या बदलाकडे आपण सकारात्मकतेने पाहतो. ही स्थितीही बदलेल, ती काही स्थिर नाही, असे मला वाटते. तसेच हे बदल होणे हे ही एका वर्तुळासारखे आहे. पुन्हा जुन्या गोष्टीही परत येतील, त्याही बदलतील... आपण फक्त सकारात्मकतेने त्याकडे पाहिले पाहिजे.