Join us

Amey Wagh : 'जग्गू'ला मिळणारं प्रेम पाहून अमेयच्या आईला अश्रू अनावर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 6:12 PM

Amey Wagh, Jaggu Ani Juliet Marathi Movie : जग्गू आणि ज्युलिएटच्या या कथेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि हे प्रेम पाहून अमेयची आई सुद्धा भारावली आहे.

Jaggu Ani Juliet Marathi Movie : दिग्दर्शक महेश लिमये यांनी दिग्दर्शित केलेला 'जग्गू आणि ज्युलिएट' हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. अमेय वाघ (Amey Wagh) आणि वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) यांनी या सिनेमात लीड भूमिका साकारली आहे. जग्गू आणि ज्युलिएटच्या या कथेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि हे प्रेम पाहून अमेयची आई सुद्धा भारावली आहे. 'जग्गू आणि ज्युलिएट' हा माझ्या लेकाच्या आजपर्यंतच्या चित्रपटांपैकी एक उत्तम सिनेमा आहे, अशी प्रतिक्रिया अमेयच्या आईने दिली. अमेयच्या आईने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. यावेळी त्या भावुक झालेल्या दिसल्या.

'जग्गू आणि ज्युलिएट' पाहून मी खरंच भारावलेय. कथा कमालीची सुंदर आहे. सर्वांनी आपलं काम अगदी चोख बजावलं आहे. चित्रपट मनाला भावतो. अमेयचा हा सिनेमा त्याच्या आत्तापर्यंतच्या सिनेमांपैकही एक उत्तम सिनेमा आहे. मी अमेयची मेहनत पाहिली आहे. या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली. म्हणूनच आज माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत, असं त्या म्हणाल्या.

मी भरून पावले...अमेय ३ वर्षांचा असतानापासून मी त्याची धडपड पाहतेय. लहानपणी त्याच्यातला स्पार्क मी ओळखला होता. म्हणून मी त्याच्यासाठी झटत होते आणि त्याने मला न्याय दिला. मी भरून पावले, असंही त्या म्हणाल्या.

अशी आहे कथा'जग्गू आणि ज्युलिएट'मध्ये जग्गू आणि ज्युलीची एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळते.  वर्सोव्यातील एका श्रीमंत कोळ्याचा मुलगा जग्गूचे तात्या एका लॉटरी तिकिटात उत्तराखंडमधील ट्रीपची तिकिटे जिंकतात आणि ते जग्गूला तेथे पाठवतात. जग्गू हा वर्सोव्यातील एका श्रीमंत कोळ्याचा मुलगा आहे. तर ज्युलिएट ही अमेरिकेत जन्मलेली, जगभर फिरण्याचा ध्यास घेतलेली मुलगी आहे. दोघांनाही आई नाही. दोघांचंही त्यांचा वडिलांसोबत असलेलं नातं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. जग्गू हा त्याच्या तात्यांशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्याचे तात्यांवर प्रचंड प्रेम असते. तर दुसरीकडे ज्युली तिच्या वडिलांचा राग असते. भारतात टूरला आल्यावर ती त्यांचा एकही फोन घेत नाही. मात्र जग्गू तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिचे वडिलांसोबतचं नांतं पूर्णपणे बदलते. जग्गू   चित्रपटात 'ती'च्या शोधात असतो. अखेर त्याला उत्तराखंडमध्ये ती सापडते. विल्यम शेक्सपिअरच्या 'रोमियो-ज्युलिएट' या पात्रांचा आधार घेत चित्रपटाची कथा फुलवण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :अमेय वाघवैदेही परशुरामीमराठी अभिनेतामराठी चित्रपट