Join us

Exclusive: शिवानी सासूबाईंना आई नाही मृणाल ताई म्हणते, काय आहे कारण? वाचा, खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 4:49 PM

Virajas Kulkarni and Shivani Rangole Interview : लग्नानंतर पहिल्यांदाच श्री व सौ कुलकर्णी यांनी ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली आणि ही मुलाखत चांगलीच रंगली.

Virajas Kulkarni and Shivani Rangole Interview : ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लाडका लेक विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni ) यानं नुकतीच अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत (Shivani Rangole) लग्नगाठ बांधली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर पहिल्यांदाच श्री व सौ कुलकर्णी यांनी ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली आणि ही मुलाखत चांगलीच रंगली. श्री व सौ कुलकर्णीनी आपली 10 वर्ष जुनी लव्हस्टोरी सांगितली. अगदी खास उखाणाही घेतला.

अजून तरी भीती वाटत नाहीये...लग्नानंतर कसं वाटतंय, कसा पहिलाच प्रश्न या दाम्पत्याला विचारला गेला. यावर काय? छान वाटतंय. मज्जाच चाललीये. अजून तरी जेवढी सगळ्यांनी भीती दाखवली होती, तेवढी वाटत नाहीये आणि कधीच वाटणार नाही, अशी आशा करतो, असं विराजस म्हणाला. शिवानीला तर अद्यापही सगळं काही पूर्वीसारखंच असल्याचं वाटतंय. वि-या आहे आणि मी आहे. इतक्या वर्ष आपण जसं वागतोय एकमेकांशी, तसंच आपण वागतोय. असं काही फार वेगळं वाटत नाहीये? असं शिवानी म्हणाली.

विराजसनं घेतला एक्सक्लुसिव्ह उखाणालग्न म्हटल्यावर उखाणा होणारच. या मुलाखतीत विराजस व शिवानी दोघांनीही मस्तपैकी उखाणाही घेतला. ‘सनई आणि चौघाडा वाजे सप्तसूरात,विराजसचं नाव घेते कुलकर्ण्यांच्या घरात...,’असा मस्त उखाणा शिवानीनं ऐकवला. विराजसने तर अगदी बसल्या बसल्या उखाणा तयार केला. ‘शिवानी जे म्हणेल, त्याच्याशी आहे मी सहमत आणि हा तुम्ही इंटरव्ह्यू बघताय आॅन लोकमत,’ असा धम्माल उखाणा त्याने घेतला.

अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी...विराजस व शिवानी यांनी आपल्या लव्हस्टोरीबद्दलही सांगितलं. आमच्या लव्हस्टोरीला आता जवळपास दशक झालं आहे. दशक होऊन गेलं आम्ही एकमेकांना ओळखतोय. पुण्यात आमची नाट्यसंस्था आहे आणि जिथे आम्ही मागची दहा वर्ष एकत्र घालवली. तिची (शिवानी) तेव्हा नुकतीच दहावी झाली होती. मी तेव्हा अगदी फर्स्ट इअरला होतो. एकत्र काम करता करता आमची मैत्री झाली. दहावर्ष एकत्र घालवल्यानंतर एक बॉन्ड तयार होतो आणि त्याच बेसवर पुढचं सगळं काही झालं, असं विराजसने सांगितलं.शिवानी म्हणाली, दहावी झाल्यानंतर मी विराजसला भेटले होते. तेव्हा मला तो क्यूट वाटला होता. अरे हा क्यूट आहे मुलगा, असं मी चुकून  कुणाला तरी म्हणले होते आणि यानंतर त्याने मला चिडवायला सुरूवात केली. यानंतर ते आपोआप विराजसपर्यंत पोहोचलं. पण तोपर्यंत काहीही नव्हतं. मग विराजसला मी आवडायला लागले. त्याला मी आवडते, हे मला तेव्हा माहित नव्हतं. मग एक वेबसीरिज एकत्र करताना विराजसने मला सांगितलं, असं शिवानी म्हणाली.

त्या माझ्यासाठीच मृणाल ताई... मी मृणाल ताईसोबत (अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ) एक फिल्म केलेली होती आणि घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे मी विराजसच्या घरी ओळखीचीच होते, असं शिवानी म्हणाली. मृणाल ताईची मृणाल आई कधी झाली? असं विचारलं असता शिवानीनं यावेळी एक खास खुलासा   केला. मी मृणाल ताई कसं म्हणते, याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पण आमचं नातं मैत्रिणींचं जास्त आहे. अद्याप तरी सासूबाई-सूनबाई असं काहीही आम्ही केलेलं नाहीये. आम्ही आधी एकत्र काम केल्यामुळे आम्ही एकमेकींना ओळखायचो. ज्या गोष्टी आधी विराजस व मृणाल ताई एन्जॉय करायच्या म्हणजे, एकत्र पुस्तक वाचणं, फिल्म बघणं, फिरायला जाणं त्या सगळ्यामध्ये आता मी पण जॉईन झालेली आहे. त्यामुळे आमची अशी मैत्री जास्त आहे. मृणाल ताईला मला ताईचं म्हणणं योग्य वाटतं. मी तिला काकू, आई म्हणणं वगैरे शक्यचं नाही, असं शिवानी म्हणाली.

टॅग्स :शिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीमृणाल कुलकर्णी