प्रयोगशील दिग्दर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सतीश राजवाडे मराठी चित्रपटांकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाविषयी 'सीएनएक्स'शी साधत आहेत संवाद.
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक अशी सतीश राजवाडे यांची मराठी चित्रपटसृष्टीला ओळख. त्यांच्या करिअरची सुरुवात झाली तिच मुळी अभिनयाने. महाविद्यालयीन काळात मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांमध्ये एकांकिका सादर करून त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले. केदार शिंदे दिग्दर्शित 'टूृरटूृर' या पहिल्या व्यावसायिक नाटकात गुजराती माणसाची भूमिका करून उत्कृष्ट विनोदाच्या पुरस्कारावर सर्वप्रथम आपले नाव कोरले. 'आॅल द बेस्ट'मधील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांना हिंदी चित्रपटासाठी विचारणा केली. त्यानंतर संशोधन, हजार चौरसी की माँ, निदान, वास्तव आणि जोशसारख्या चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले. 'चित्रपट' हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो, याची जाणीव झालेल्या राजवाडे यांना कॅमेरामन होण्याची खूप इच्छा होती. पण एडिटिंग त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक वाटल्याने त्यांनी आपला मोर्चा एडिटिंगकडे वळविला. मात्र स्वत:ला हव्या त्या पद्धतीने कथानक मांडता आले पाहिजे, या आकांक्षेतून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात ते उतरले. मग चित्रपट आणि मालिका दिग्दर्शनाकडे स्वत:चे लक्ष्य त्यांनी केंद्रित केले. मृगजळ, एक डाव धोबीपछाड, गैर, मुंबई-पुणे-मुंबई 1/2, प्रेमाची गोष्ट, सांगतो ऐका या चित्रपटांसह असंभव, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा त्यांच्या अनेक मालिका गाजल्या. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सतीश राजवाडे मराठी चित्रपटांकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाविषयी 'सीएनएक्स'शी साधत आहेत संवाद.क्लासी आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांमुळे प्रेक्षकवर्ग विभागला गेला आहे असं मला मुळीच वाटत नाही. कारण मनोरंजन करणे हे चित्रपटांचे मूळ उद्दिष्ट असते. क्लासी चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षक आहे, हे अगदीच मान्य आहे, पण म्हणून फक्त क्लासी किंवा फक्त मनोरंजन करणारे चित्रपटच आम्ही पहाणार असं कोणी म्हणत नाही. कारण क्लासी प्रेक्षकवगार्ला त्यांचा चित्रपट त्यांच्या पद्धतीने एन्टरटेन करतो. पूवीर्पेक्षा मराठी इंडस्ट्रीत खूप मोठय़ा प्रमाणावर बदल झाले आहेत. पूर्वी विशिष्ट धाटणीचे चित्रपट तयार होत असत. पण आता खूप वेगवेगळे प्रयोग इथे केले जात आहेत. अनेक फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट दाखवले जात आहेत. हा बदल खूप सकारात्मक आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की मराठी इंडस्ट्रीत अजून काही बदल होण्यापेक्षा आत्ताची ही स्थिती कायम राहू द्यावी. ते टिकवणं हे आपल्यापुढे मोठं आव्हान आहे. चांगला चित्रपट तयार करणे हे प्रत्येकच दिग्दर्शक, निमार्ता, कलाकराचं स्वप्न असतं. या वाटेवर प्रचंड अडचणी असतात. पण माज्या मते, चित्रपट सृष्टीतील आव्हान म्हटलं तर आपण केलेली कलाकृती प्रेक्षकवगार्ला आवडणे ही असते. आपल्याला आवडलेली गोष्ट लोकांना आवडणे सर्वांत महत्त्वाचे असते. कारण आपण एका गोष्टीची कल्पना केलेली असते, पण ती तशीच्या तशी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सगळ्यात अवघड काम आहे. आज मराठीत खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. असे प्रयोग केले गेलेच पाहिजेत. कारण प्रत्येक दिग्दर्शकाला स्वत:ची स्टाइल तपासून पाहायची असते. त्यामुळे असे प्रयोग वारंवार करत राहणं गरजेचं आहे. जसं आपल्याला एखादं पुस्तक सारखं सारखं वाचायला नाही आवडत. तसेच चित्रपटांचेही आहे. प्रयोग केले तरच मराठी चित्रपट अजून यश मिळवेल आणि प्रेक्षकही या प्रयोगांना पसंती देत आहेत. कारण अशा चित्रपटांमुळे प्रेक्षकांची मानसिकता, विचार करण्याची पद्धत बदलायला मदतच होत आहे.