सध्या जाहिरातींमधूनही कधी नव्हे इतके मराठी चेहरे आता दिसू लागले आहेत. अशाच वेगवेगळ्या जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील ही दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल उडवणार आहेत.
या दोघांचा जाहिरातीतला ‘शॉर्ट अँड स्वीट’ असा अंदाज या चित्रपटातून ही दिसणार आहे. २६ फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे. ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
शंतनू ही मध्यमवर्गीय व्यक्तिरेखा साकारत निखिल एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत तर आयुष्य म्हणजे ‘खाओ पिओ ऐश करो’ असं मानत पार्ट्या करीत अय्याशी करणाऱ्या विकीची भूमिका कांचन साकारत आहे. परस्परविरोधी अशा या दोन्ही भूमिका असल्या तरी सरतेशेवटी या जोडगोळीचा अतरंगीपणा, त्यातून निर्माण झालेला पेच याची मनोरंजक पण तितकीच विचार करायला प्रवृत्त करणारी कथा म्हणजे ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट. आज ‘सोशल राहणं’ ही काळाची गरज असली तरी व्यक्त होण्याच्या या माध्यमाच्या योग्य वापराचं भान ठेवणं ही तितकंच महत्त्वाच आहे. हे भान सुटलं तर कठीण प्रसंग निर्माण होऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
निखिल रत्नपारखी, कांचन पगारे यांच्यासोबत विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे.