Join us

आयुष्यावर शतदा प्रेम करायला लावणारा कौटुंबिक मनोरंजक लव यु जिंदगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:55 AM

चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे.

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माण झाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे.

ट्रेलरदेखील टीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट’ करता येण्याजोगा आहे.

ट्रेलर अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीची कथा दर्शवतो. वयानुसार आयुष्य जगण्याबाबत समाजाने घालून दिलेल्या स्टिरिओटाईप्स मापदंडांंना उधळून लावणारा हा अनिरुद्ध दाते वाटतो. हा सिनेमा सकारात्मक संदेश देणारा, मनाला स्पर्श करणारा आहे. वय झालं म्हणून व्यक्तीने आनंदी राहायला फक्त  समाजाच्या दृष्टीने वयाला साजेशेच काम किंवा छंद बाळगण्याची गरज नसते, वय फक्त शरीराच्या वयाचा आकडा असतो ते मनाच्या व्यापकतेचे परिमाण नसतं. मनाचा तजेला, आनंद, जिंदादिली हे  वयानुरूप येणाऱ्या, तथापि लादल्या जाणाऱ्या बाह्य बाबींवर अवलंबून नसते, नसावे, हेच हा सिनेमा सांगतो. 

कधी कधी रटाळ झालेल्या आयुष्यात अचानक कोणीतरी येतं आणि जीवनात आनंद, उत्साह पूर्वीसारखा निर्माण होतो. आयुष्याला वेगळी दिशा मिळते. चित्रपटात पुण्याचे अनिरुद्ध दाते यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक  त्यांचं वय झाल्याची सतत जाणीव करून देत असतात त्यामुळे ते हैराण होत असतात. अश्यावेळी त्यांच्या आयुष्यात रिया येते. अनिरुद्ध आणि रिया यांच्यात मैत्री होते. त्यांची मैत्री अनिरुद्ध दातेच्या आयुष्याला वेगळी आशा आणि दिशा  देते, सकारत्मकतेने आयुष्याकडे बघायला सांगते. अनिरुद्ध दातेंमधील उत्साहाच्या, आनंदाच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गोळा निघतो आणि त्यांच्या आयुष्यात चैतन्याचा प्रवाह वाहू लागतो.  ते नव्याने पुन्हा जोमात आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. पण समाजाने आखून दिलेल्या ठराविक मापदंडांना नाकारणाऱ्या, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगणाऱ्याला अडचणींचा सामनाही कधीतरी मग करावाच लागतो.अशावेळी जिंदादील व्यक्ती असलेल्या अनिरुद्ध दातेचीही उडणारी तारांबळ ही गंमतीदार झालीये. 

“लव यु जिंदगी” या चित्रपटातुन हाच संदेश जातो. एक सकारात्मक, टवटवीत विषयावरील चित्रपट मनाला आनंद देऊन जातो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. त्यांच्याशिवाय आणखी कोण या भूमिकेला न्याय देऊ शकणार! अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेला सुरेख न्याय दिलाय. प्रार्थना बेहरेला ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे.

लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, सकारात्मक, कौटुंबिक मनोरंजक “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. आयुष्यावर प्रेमाची पुनःश्च उधळण करायला प्रेरित करणारा “लव यु जिंदगी”! कारण या जीवनावर याच जीवनात शतदा प्रेम करावे.

टॅग्स :लव्ह यु जिंदगीसचिन पिळगांवकर