अभिनय क्षेत्रात कोणाला किती यश मिळेल आणि कधीपर्यंत हे सांगता येत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काहींना यशही मिळतं. पैसा, प्रसिद्धी सगळं काही मिळूनही यश मात्र दिर्घकाळ टिकत नाही.बदलत्या काळानुसार कलाकाराचे स्टारडमही कमी होत जाते. मराठी सिनेसृष्टीत ८० आणि ९० चे दशकं गाजवणारे कलाकार आज कुठे आहेत कोणालाच याविषयी काही माहिती नाही. अशीच एक अभिनेत्री जिने सुरुवातीच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. दिग्गज कलाकारांसोबत झळकली अभिनयानेच नाहीतर सौंदर्यांनेही रसिकांची पसंती मिळवली ती अभिनेत्री आहे रेखा राव.
रेखा राव यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम केले आहे. 'धरलं तर चावतंय', 'प्रेम करूया खुल्लमखुल्ला', 'शुभ मंगल सावधान', 'आमच्यासारखे आम्हीच' हे रेखा राव यांचे गाजलेले सिनेमे. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींचा दबदबा असतानाही रेखा राव यांनी आपल्या अभिनयकौशल्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
मुळात लहानपणापासून रेखा यांना डान्सची आवड होती. किशोर कुमार यांच्या समोर परफॉर्म करायला संधी त्यांना मिळाली होती. मिळालेल्या संधीचे रेखा यांनीही सोनं केलं आणि यानंतर त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. डान्सप्रमाणे अभिनयाची देखील त्यांना आवड निर्माण झाली. अनेक सिनेमांच्या ऑफर्स त्यांना मिळाल्या. अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी हिट ठरली. दोघांनीही अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे.
मराठी रुपेरी पडदा गाजवल्यानंतर हिंदी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या यापैकी 'हम दिल दे चुके सनम', 'तेहजीब' , 'हिरोज' यांसारख्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. ‘हम दिल दे चुके सनम’ मधील नकारात्मक भूमिका असली तरीही लक्षवेधी ठरली होती.
सध्या त्या कुठे आहेत ? काय करत आहेत असे प्रश्न तुम्हालाही पडले असणारच. सध्या मराठी आणि हिंदीत त्या झळकत नसल्या तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सिनेमा आणि मालिकेत त्या काम करत आहेत. बँगलोरमध्येच त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. रेखा राव यांचा आजही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.पूर्वीप्रमाणे आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात. आजही रेखा राव यांची जादू कायम आहे.