नागराज मंजुळे ( Nagraj Manjule) यांच्या 'फँण्ड्री' (Fandry) या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सोमनाथ अवघडे (Somnath Awghade). 'फँण्ड्री' या चित्रपटानंतर सोमनाथचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, सोमनाथ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमनाथची मुख्य भूमिका असलेला 'फ्री हिट दणका' (Free Hit Danka) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी सोमनाथ प्रचंड मेहनत घेत असून शुटींग दरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतरही त्याने चित्रीकरण सुरु ठेवल्याचं सांगण्यात येतं.
अलिकडचे दादरच्या शिवाजी पार्क मैदानात फ्री हिट दणकाची टीम आणि पार्कातील मैदानात खेळणारे खेळाडू यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला. विशेष म्हणजे या सामन्यात सोमनाथने चित्रपटासाठी केलेली मेहनत दिसून आली. या सामन्यानिमित्त सोमनाथने शुटींगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला.
'फ्री हिट दणका' हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी सोमनाथला क्रिकेटमधील अनेक बारकावे शिकावे लागले. यामध्येच त्याला क्रिकेट शिकत असतांना दुखापत झाली.
"मुळात हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याने क्रिकेटमधील अनेक बारकावे लक्षात घेणे खूप महत्वाचे होते. एरव्ही क्रिकेट खेळणं आणि रितसर पद्धतीने क्रिकेट खेळणं यात खूप फरक आहे. जरीही तो अभिनय असला तरीही कुठेही तो अनैसर्गिक वाटू नये, यासाठी खूप मेहनत घेतली. सतत क्रिकेटचा सराव केला. व्हिडिओज बघितले. मिळेल त्या वेळात क्रिकेटचा सराव केला. एकदा अशीच सरावादरम्यान मला गंभीर दुखापतही झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सराव सुरु ठेवला, असं सोमनाथने सांगितलं.
दरम्यान, सोमनाथला झालेल्या या दुखापतीचा त्रास त्याच्या चेहऱ्यावर यत्किंचितही दिसून आला नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अपूर्वा एस., 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज शेख(सल्या) आणि तानाजी गालगुंडे(लंगड्या) यांनी स्क्रीन शेअर केली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.