दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात ही जोडी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटातून सोमनाथ 'जब्या'च्या तर राजेश्वरी 'शालू'च्या भूमिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली होती.
समाजातील जाती व्यवस्थेला आरसा दाखवणाऱ्या संवेदनशील कथेमुळे 'फँड्री'नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. तर पण त्यासोबतच चित्रपटातील जब्या आणि शालूची भूमिका अतिशय खुबीनं साकारल्यामुळे सोमनाथ, राजश्री यांची आजही चर्चा होते. त्यामुळेच ही जोडी सध्या काय करते? अशा चर्चा सुरू होत्या. पण आता या सर्व चर्चांना ब्रेक मिळणार आहे. कारण जब्या आणि शालू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
चित्रपटाचं नाव अजूनही कळू शकलं नसलं तर चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सोमनाथ आणि राजेश्वरी यांच्या या चित्रपटाची घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. मात्र अजूनही चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. २०११ साली नागराज मंजुळे यांना पिस्तुल्या या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्ताने त्यांचा केम गावात सत्कार होता, त्यावेळी हलगी वाजवणारा सोमनाथ त्यांना दिसला. आणि 'फँड्री' साठी त्यांनी सोमनाथची निवड केली होती.