क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात वैज्ञानिक ओपेनहायमरची भूमिका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी याने साकारली आहे. ‘ओपेनहायमर’ चित्रपटात सिलियन मर्फी एका इंटिमेट सीनदरम्यान भगवद्गीतेतील काही ओळींचं वाचन करतानाचं दृश्य दाखविण्यात आलं आहे. या सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी ‘ओपेनहायमर’मधील या सीनबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आता फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने याबाबत पोस्टमधून भाष्य केलं आहे.
राजेश्वरी खरातने ‘ओपेनहायमर’ चित्रपटाबाबत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने ‘ओपेनेहायमर’मधील वादग्रस्त सीनचा निषेध केला आहे. “हिन्दू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादी विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात. पण, या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय. आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे. यावर कोणी जास्तं काही बोलेनात. सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी,” असं राजेश्वरीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...
राजेश्वरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी राजेश्वरीच्या पोस्टवर कमेंट करत ‘ओपेनहायमर’मधील दृश्यांचं समर्थन केलं आहे. “सिनेमातल्या एका दृश्याने पावित्र्याला बाधा यावी ईतकी श्रीमदभगवदगीता लेचीपेची नाही. विश्वाचं ज्ञान त्यात आहे. अशा प्रसंगी काय करावे हे साक्षात भगवान श्रीकृष्णानेच भगवदगीतेत उधृत केले आहे. चित्रपटव्यवसायाशी संबधीतानी तरी या असल्या व्यर्थ फंदात पडू नये. खूप सिनेमे वेगवेगळ्या कारणाने बॉयकॉट होऊ लागतील आणि कुठलीही कलाकृती बॉयकॉट करा असं एक आर्टिस्ट कसं म्हणू शकतो ? आपली श्रध्दा आणि धर्मग्रंथाशी निगडीत पावित्र्याच्या संकल्पना आपण जोपासू. त्यांचं त्यांच्यापाशी…अशा निरुपद्रवी बाबी वर गदारोळ कशाला? अनेक मोठे प्रश्न आहेत देशासमोर…त्याचं बघू….” असं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
“मी बहिरी नाहीये”, पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “म्हणून अमिताभ बच्चन...”
दरम्यान २१ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतातही चांगली कमाई करताना दिसत आहे. अवघ्या तीनच दिवसांत या चित्रपटाने देशात ५० कोटींचा गल्ला जमवला.