महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा रिलीज झालाय. काल २६ एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. सिनेमाचा प्रीमियर शो काल मुंबईत झाला. त्यावेळी बॉलिवूडचा अभिनेता - दिग्दर्शक फरहान अख्तरने अल्ट्रा मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत मांडलंय. फरहान म्हणाला, "खूप सुंदर सिनेमा आहे. खूप सशक्त कथानक असलेला सिनेमा आहे. अत्यंत जबाबदार लोकांनी हा सिनेमा बनवला आहे. महेश मांजरेकर आणि अनुष्का सुद्धा आहे या सिनेमात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर सिनेमा आहे."
फरहान पुढे म्हणाला, "समांतर आणि आर्ट सिनेमा असा काही फरक राहिला नाही. जुनं फर्निचर सुद्धा मुख्य धारेतला सिनेमा आहे. असे सिनेमे बनले पाहिजेत, जे एका विषयाला धरून रोमांचक कथानक प्रेक्षकांसमोर आणतील. त्यामुळे मला खूप आनंद होतो जेव्हा मी असा सिनेमा पाहतो. मराठी सिनेमा सर्वांना एक दिशा दाखवण्याचं काम करतोय. हिंदीमध्ये सुद्धा असे विषय निर्माण होत आहेत. समाजातील जे विषय आहेत ते सिनेमाच्या माध्यमातून समोर आले पाहिजेत. त्यामुळे लोकांच्या हृदयाला हे विषय भिडतील आणि त्यांचं मनोरंजन सुद्धा होईल, त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे."
मराठी सिनेमात काम कधी करणार यावर फरहान अख्तर म्हणाला, "मी एका मराठी सिनेमाची voice over दिला होता. त्यामुळे मला सिनेमाच्या भूमिकेशी महत्त्व आहे. कोणी निर्माता - दिग्दर्शक माझ्याकडे आला, आणि त्याला वाटलं की मी त्या भूमिकेसाठी योग्य आहे. तर नक्कीच मी काम करेन." महेश मांजरेकर लिखित - दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' सिनेमा २६ एप्रिलला रिलीज झालाय.