कथा, निर्मिती, दिग्दर्शन यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत पन्हाळ्यावर केलेल्या अतुलनीय शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘फर्जंद’ चित्रपट १ जूनला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दिग्दर्शकीय कौशल्याला मिळालेली कलाकारांची उत्तम साथ आणि निर्मात्यांनी केलेल्या अफलातून मार्केटिंग मुळे या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. १ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सलग सातव्या आठवड्यातही प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरू असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.महाराष्ट्राचे आराध्यदैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हटले की, आजही अनेकांचा ऊर भरून येतो. आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास आजवर अपवादानेच रुपेरी पडद्यावर मांडला गेला आहे, त्यामुळेच मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा अनेकांना भावली. महाराजांची रणनीती त्यांच्या शिलेदारांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टी अचूकपणे यात दाखवल्या आहेत. अॅक्शन सीन, ताल धरायला लावणारं संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी फर्जंदच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘फर्जंद’ च्या टीमने दाखवून दिले आहे.‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.‘फर्जंद’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे, निखिल राऊत, अस्ताद काळे, हरिश दुधाणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘फर्जंद’ या चित्रपटाने गाठला हा पल्ला, बॉक्स ऑफिसवर सुरू आहे घौडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:08 AM