‘फास्टर फेणे’ फेम अमेय वाघने पत्नी साजिरी देशपांडेबद्दल केला ‘हा’ खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 7:02 AM
मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अमेय वाघ काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला असून, लग्नानंतर त्याचा पहिलाच ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट रिलीज ...
मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अमेय वाघ काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला असून, लग्नानंतर त्याचा पहिलाच ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामुळे अमेयसाठी यंदाची दिवाळी आनंद द्विगुणित करणारी ठरली आहे. असो, अमेयने त्याची पूर्वाश्रमीची मैत्रीण आणि आता पत्नी असलेल्या साजिरी देशपांडेबद्दल एक खुलासा केला आहे. होय, अमेयने पत्नी साजिरीला त्याची सर्वात मोठी समीक्षक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ती माझ्या कुठल्याही कामावर सहजासहजी खुश होत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. अमेयचा नुकताच ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, समीक्षकांनीही त्याच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. परंतु अमेयला पत्नी साजिरी हिचे त्याच्या चित्रपटाबद्दलचे समीक्षण महत्त्वाचे आहे. त्याच्या मते, साजरीबरोबर जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हा माझा ‘मुरांबा’ हा चित्रपट हिट झाला. आता लग्न झाले आणि लग्नानंतर माझा पहिलाच चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या तेरा वर्षांपासून आमच्यात मैत्री होती. त्यामुळे तेव्हापासून मला तिचा पाठिंबा मिळत आहे. खरं तर मी तिला माझी सर्वात मोठी समीक्षक समजतो. कारण ती पटकन माझ्या कुठल्याही कामावर खुश होत नाही. अगोदर ती ते काम खोडून काढते, त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देते. मी तिला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट दाखविला. त्यामुळे माझ्यासाठी इतरांचे मत एका बाजूला अन् बायकोचे मत एका बाजूला असल्याचे त्याने म्हटले. अमेयचा हा खुलासा खरोखरच त्याच्याकरिता मोलाचा म्हणावा लागेल. असो, अमेय वाघ पुण्याच्या कॉलेजमध्ये असतानापासून नाटक, एकांकिकेत काम करत असे. त्यावेळेस साजिरी नाटकाची तालीम पहायला येत असे. अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि मैत्रिणींकडून त्याला भेटण्यासाठी निरोप पाठवला. अमेय भेटायला गेल्यानंतर साजिरीने प्रेम व्यक्त केले. पण अमेय त्याकाळात एका नाटक स्पर्धेसाठी काम करत होता. त्यामुळे त्याने नंतर उत्तर देईल, असे सांगून साजिरीला पाठवून दिले. पुढे त्याने तिला होकारही दिला. त्यानंतर २ जून २०१७ रोजी तब्बल १३ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. टिपीकल मराठी पद्धतीने दोघांचा पुण्यात विवाहसोहळा पार पडला.