नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ हा संगीतमय प्रेमपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित या संगीतप्रधान चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.
‘फतवा’ चित्रपटाचे संगीत विविध शैलींचा अनोखा अनुभव देणारे आहे. वेगवेगळ्या जॉनरच्या सहा सुमधुर गाण्यांचा नजराणा यात असून विशेष म्हणजे अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेले ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे ख़ास आकर्षण आहे.
वेगवेगळ्या ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार डॉ.विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं ‘चोरून चोरून’, ‘सजनी दोघं एक होऊ’ या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर वेदा नेरुरकर यांचे मधुर स्वर लाभले असून संजीव–दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. आराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं ‘अली मौला’ ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.
रवि आणि निया यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘फतवा’ चित्रपटात बघायला मिळणार आहे. या नव्या जोडीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत.