Fatwa marathi Movie : वेगवेगळ्या सिनेमांच्या कथांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी सिनेमे सध्या लक्षवेधी ठरतायेत. नुकताच असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. ‘फतवा’ ( Fatwa) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात प्रेमाची एक कथा दाखविण्यात आलीये. अभिनेता प्रतिक गौतम (Pratik Gautam ) हा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केलाय आणि लिहिलाय सुद्धा त्यानेच. प्रतिक पहिल्यांदाच या तिनही गोष्टी एकत्र करतोय. नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिकने हा सिनेमा कसा बनला, तसंच सिनेमासाठी त्याने किती मेहनत घेतलीये हे सांगितलंय. पाहा प्रतिक काय म्हणलाय ते...
पहिला सिनेमा बनवायला 6 वर्षे लागली...फतवा बनवायला प्रतिकने 6 वर्षे लावलीत..., यावर तो बोलला. तो म्हणाला, ‘मी जे काही साडेपाच-सहा वर्षे लावली आहेत ती फक्त यासाठी की, माझ्या मायबाप प्रेक्षकांच्या एका दिवसातले 2 तास 20 मिनिटं हे एंटरटेनिंग व्हावेत. मी या प्रयत्नात पास झालो का? मी कुठे चुकलो का? हे आता मला जाणून घ्यायला आवडणार आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा आणि मला प्रामाणिक प्रतिक्रिया द्याव्यात, अशी माझी इच्छा आहे. ’
माझ्यातला दिग्दर्शक सुखावला...माझ्यातील दिग्दर्शक सुखावत नव्हता. म्हणूनच हा सिनेमा बनवायला मी इतका वेळ घेतला. आपण एखादं चित्र बनायला घेतो, त्यात सुंदर सुंदर रंग भरतो. पण तरिही काहीतरी राहून गेलंय, असं मनाला वाटत राहतं. हा चित्रपट बनवतानाही हीच भावना होती. पण फायनली, हे फार सुंदर झालंय, असं मला वाटलं. झोपेत पडलेलं स्वप्नं मी आज डोळे उघडून बघतोय, असं मला वाटतंय, असंही प्रतिक म्हणाला.