कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. माणसांच्या नॉर्मल आयुष्यात अचानक अशी काही स्थित्यंतरं आलीत की, काहीक्षण सर्वच भांबावलीत. एका अदृश्य विषाणूच्या भीतीनं स्वत:ला घरात कोंडून घेण्याची वेळ आली, धावत्यापळत्या आयुष्याला ब्रेक लागला. अनेकांनी आपले जीवाभावाचे लोक गमावले, अनेकांचे रोजगार गेलेत आणि अनेकांवर राहतं घर सोडून हजारो मैल पायपीट करण्याची वेळ आली.
दोन अडीच वर्षानंतर सगळं काही ‘न्यू नॉर्मल’ होणार असं वाटत असतानाच आता ओमायक्रॉनचं नवं संकट दाराशी आल्यानं सर्वांचीच चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहे. साहजिकच पुन्हा एकदा लोक दहशतीत आहे. पण लढण्याशिवाय पर्याय नाही. मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) याची पोस्ट सध्या खास चर्चेत आहे. लढा, असा संदेश त्यानं या पोस्टद्वारे दिला आहे.
प्रसादने अलीकडे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत स्वत:चा लाल रंगाच्या टी-शर्टमधील फोटोही त्यानं पोस्ट केला आहे. त्याच्या या टी-शर्टवर ‘लढ’ असं लिहिलेलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं, ‘आता कोणताही व्हायरस आला, कशीही परिस्थिती आली तरी स्वत:ला... कुटुंबाला आणि जवळच्या प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं... ‘लढ’प्रसादची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसाद सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकत आहे.