Join us

लेखक-गीतकाराच्या ना हरकत पत्राशिवाय चित्रपटाला मान्यता नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 1:09 PM

चित्रपटलेखक व गीतकाराचे मानधन आणि श्रेयनामावलीतील उल्लेख याबाबतीत अनेक निर्मात्यांकडून फसवणूक होण्याच्या प्रकारांना आता चाप बसणार असून लेखक व ...

चित्रपटलेखक व गीतकाराचे मानधन आणि श्रेयनामावलीतील उल्लेख याबाबतीत अनेक निर्मात्यांकडून फसवणूक होण्याच्या प्रकारांना आता चाप बसणार असून लेखक व गीतकार यांचे ना हरकत पत्र असल्याशिवाय चित्रपट महामंडळाकडून मंजूरी दिली जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतला असून याबाबतची जाहीर सूचनादेखील त्यांनी तातडीने प्रसिध्द केली आहे. या निर्णयामुळे लेखक व गीतकार यांची ना हरकत पत्रे सोबत सादर केल्याशिवाय चित्रपट अनुदानासाठीदेखील पाठवता येणार नाही. चित्रपटाचा मूलभूत आधार असलेल्या लेखक-गीतकारांसाठी हा एक फार महत्वाचा निर्णय मानला जात आहे.मालिका, नाटक व चित्रपट माध्यमांतील लेखकांना एकत्र आणणार्‍या ‘मानाचि’ लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री. राजेभोसले यांची भेट घेऊन लेखकांबाबत होणार्‍या फसवणूकीच्या अनुषंगाने आपल्या समस्या मांडल्या. लेखक-गीतकारांसह चित्रपटाच्या कोणत्याही विभागातील कलावंत-तंत्रज्ञाची फसवणूक होऊ नये, यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. श्री. राजेभोसले यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फसवणूक न होण्यासाठी प्रत्येकाने निर्मात्यासोबत कायदेशीर करारपत्र करणे आणि लेखक व गीतकाराच्या कामाचे यथोचित श्रेय देण्यासाठी चित्रपटाच्या प्रसिध्दीवेळी पोस्टर, होर्डींग्ज यासह ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, त्या ठिकाणी लेखक व गीतकार यांच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.मानधन व श्रेय या बाबतीत लेखकांच्या समस्या फारच गंभीर असल्याने मानाचिच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान श्री. राजेभोसले यांनी तातडीने हे निर्णय जारी करणारी सूचना जाहीर केली. लेखक-गीतकाराचे ना हरकत पत्र असल्याशिवाय चित्रपट सेन्सॉरसंमतही होऊ नये, यासाठी कार्यवाही सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.मराठी चित्रपट महामंडळ ही सुमारे ३० हजार सभासद असलेली देशातील एकमेव चित्रपट संस्था असून या सर्व सभासदांच्या माहितीचे संकलन आता डिजिटल माध्यमात करण्याचे काम सुरु झाल्याचेही ते म्हणाले. तसेच लेखकांच्या संहितांची महामंडळाकडे नोंदणी करण्यासाठीची व्यवस्थादेखील सुरु करण्यात येत आहे. अनेक नवोदित लेखकांना आपल्या कथा-कल्पना निर्मात्यांसमोर मांडणे शक्य व्हावे, यासाठी महाराष्ट्रभरातल्या लेखकांकरीता मानाचिच्या साथीने चित्रपट महामंडळ, मराठी नाट्य परिषद, साहित्य परिषद अशा संस्थांनी एकत्र येऊन राज्यभरात कार्यशाळा आयोजित करणे, निर्माता व लेखकांच्या अडचणी तसेच लेखकांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लेखक आणि निर्माता यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी उपक्रम राबवणे, लेखकांचे हक्क व अधिकार याबाबत महामंडळाच्या सहकार्याने चर्चासत्र, कार्यशाळेचे आयोजन करणे अशा अनेक पातळीवर महामंडळ आता काम करेल, असे ते म्हणाले. चित्रपटसंवर्धन कार्यामध्ये रसिकांचाही सहभाग वाढावा यासाठी अशा रसिकांना मतदानाचा अधिकार नसलेले सभासदत्व देण्याचा विचार सुरु असल्याचेही श्री. राजेभोसले यांनी सांगितले. शिष्टमंडळामध्ये मानाचिचे सचिव श्रीनिवास नार्वेकर, कौस्तुभ दिवाण, मनिषा कोरडे, मंदार चोळकर, भरत सावले यांचा सामावेश होता.