Join us

लिंबू पाण्यापेक्षा बिअर स्वस्त....; बिलाचा आकडा पाहून विजू माने व कुशल बद्रिकेला फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 15:51 IST

Viju Mane Fecebook Post : जावा अजून उत्सवाला.... आता हे लिंब लोन उतरवणार कसं? लोकांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया...

ठळक मुद्देतुमच्या दोघांचा राहुल बोस झाला. त्याने दोन केळी 442 रूपयाला खाल्ली, तुम्ही 310 ला दोन लिंबू सरबत प्यायली. वरती झटका चटका फ्री मिळाला... हाहाहा, अशी मजेदार कमेंट एका युजरने केली आहे.

विजू माने (Viju Mane ) हे प्रत्येक चित्रपटप्रेमींना परिचित असलेले नाव. ती रात्र,  शर्यत, खेळ मांडला, बायोस्कोप  या चित्रपटातील ‘एक होता काऊ’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने यांना ‘ऑक्टोबर हिट’ असह्य झाली. मग काय, कडक उन्हाचे चटके असह्य झाल्यावर त्यांना बिअर प्यायची अनावर इच्छा झाली. कुशल बद्रिकेची (Kushal Badrike )सोबत होतीच. पण कुशलने बीअरऐवजी लिंबू पाण्याला पसंती दिली आणि मग हे दोन्ही यार ठाण्याच्या एका हॉटेलात पोहोचले. पुढे काय तर, गारेगार लिंबू सरबत पुढ्यात आलं. गप्पा गोष्टी करत ते मस्तपैकी पोटात रिचवलं गेलं. पाठोपाठ बिल आलं आणि बिलाचा आकडा पाहून विजू व कुशल दोघेही शॉक्ड झालेत. होय, लिंबू सरबतापेक्षा बिअर स्वस्त आहे, असं म्हणण्याची पाळी दोघांवरही आली.विजू माने यांनी फेसबुकवर याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.

‘ मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बीयर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. ( हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे)...’, अशी ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. या पोस्टसोबत विजू यांनी बिलाचा फोटोही शेअर केला आहे. दोन ग्लास लिंबू सरबतासाठी त्यांना एकूण 325 रूपये मोजावे लागलेत.  नेटक-यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया...विजू यांच्या या पोस्टवर नेटक-यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. जावा अजून उत्सवाला, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. आता हे लिंब लोन उतरवणार कसं? अशी मजेदार कमेंट एका नेटक-याने केली आहे. आता ह्यापढे कुशल दादा नेहमीच विजू दादाचं ऐकणार, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तुमच्या दोघांचा राहुल बोस झाला. त्याने दोन केळी 442 रूपयाला खाल्ली, तुम्ही 310 ला दोन लिंबू सरबत प्यायली. वरती झटका चटका फ्री मिळाला... हाहाहा, अशी मजेदार कमेंट एका युजरने केली आहे.

टॅग्स :विजू मानेकुशल बद्रिके