Join us

लग्नानंतरची पहिली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2016 2:20 PM

दिवाळी सण तेजाचा, आनंदाचा, सुखसमृद्धीचा. अशा दिवाळी सणाचे सेलिब्रेशन कशापद्धतीने अतिशय चांगले करण्यात येईल याचाच सगळे प्रयत्न करत असतात. ...

दिवाळी सण तेजाचा, आनंदाचा, सुखसमृद्धीचा. अशा दिवाळी सणाचे सेलिब्रेशन कशापद्धतीने अतिशय चांगले करण्यात येईल याचाच सगळे प्रयत्न करत असतात. यंदाची दिवाळी मृणाल दुसानीससाठी खूप खास आहे. कारण लग्नानंतरची तिची ही पहिलीच दिवाळी आहे. याचनिमित्ताने मृणालशी मारलेल्या खास गप्पा...
यंदाची दिवाळी तुझ्यासाठी खूप खास आहे. लग्नानंतरची तुझी ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे यंदा तुझे काय प्लॅन आहेत?
लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असल्यामुळे माझ्यासाठी खूपच खास आहे. पण नीरज हा कामानिमित्त अमेरिकेतच राहात असल्याने आमची पहिली दिवाळी आम्हाला एकत्र साजरी करता येणार नाही. माझ्या लग्नानंतरच्या पहिल्याच दिवाळीला तो इथे नसल्याने मी त्याला मिस करतेय. माझे लग्न झाल्यानंतर लगेचच मी अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. गेली कित्येक दिवस मी या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या मालिकेचे सगळे चित्रीकरण मुंबईत होते तर माझे सासर पुण्याचे आहे. त्यामुळे मला माझ्या नव्या कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देत येत नाही. त्यामुळे आता दिवाळीच्या निमित्ताने मी खास सुट्टी घेतलीय आणि अधिकाधिक वेळ मी त्यांच्याबरोबर घालवणार आहे. 
 पती -पत्नीचे नाते दृढ करणारा पाडवाही तितकाच स्पेशल असतो, नीरजने तुला पाडव्या निमित्त काय गिफ्ट दिले आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल ? 
 खरे तर, नीरजला दिवाळीत सुट्टी मिळणे कठीण होते. त्याची कमी तर जाणवते आहेच. मला खूश  करण्यासाठी त्याने पाडवानिमित्त सरप्राईज गिफ्टचे प्लॅनिंग केले आहे. सध्यातरी इतकेच कळले आहे. पाडव्याच्या दिवशी ते गिफ्ट मला मिळणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र दुसरी गोष्ट सांगावीशी वाटतेय. कुटुंबाला आज आपण वेळ देऊ शकतो. सारे कुटुंब आपल्या बरोबर असते हा आनंद गिफ्टपेक्षाही मोठा असतो. काही दिवसांपूर्वीच नीरज खास माझ्यासाठी सुट्टी काढून आला होता. तेही माझ्यासाठी एक गिफ्टच होते.
 दिवाळी हा सण तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे?
 दिवाळीत फराळावर ताव मारायला मला खूप आवडतो. तसेच लहानपणापासून या सणाला आम्ही सगळे मिळून खूप मजामस्ती करायचो. परीक्षा संपताच दिवाळीच्या तयारीला सुरुवात व्हायची.आईबाबांसोबत कपडे खरेदी करणे, फिरायला जाणे सारे काही फुल आॅन धम्माल असायचे. लग्न झाल्यानंतर मला आता भाऊबीजेचे खरे महत्त्व कळतेय. 
दिवाळीत तू फटाके वाजवतेस की तुला प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करायला आवडते?
 मला मुळातच मोठे आवाज करणारे फटाके वाजवणे आवडत नाही. प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्याकडेच माझा कल असतो. फारफार तर मी पाऊस, चक्र, जे कमी आवाज करतील असे फटाके वाजवलेत. सगळ्यांनी शक्यतो प्रदुषणाची हानी होणार नाही, असेच फटाके वाजवावेत, असे मला वाटते.
 तुम्ही तुमच्या मालिकेच्या सेटवर दिवाळी कशी साजरी केली?
कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्यात एक वेगळा आनंद असतो. पण मालिकेत काम करत असताना दिवसातील अनेक तास आम्ही सेटवर घालवत असतो. त्यामुळे मालिकेची टीमही  आमचे दुसरे कुटुंब बनते. त्यामुळे या कुटुंबासोबतही मजामस्ती करत दिवाळी साजरी केली. माझ्या सा-या रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !Suvarna.jain@lokmat.com