सगळं काही कुशल मंगल असताना आलेलं वादळ मुळापासून हादरवून सोडतं. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, स्वतःला सिद्ध करण्याचा. '३१ दिवस' आहेत तरी काय? कशासाठी? कोणासाठी? थोडक्यात सांगायचं झालं तर... ध्येयपूर्तीचे '३१ दिवस'. सिनेमातील नायकाच्या प्रवासातील ध्येय्यपूर्तीचे '३१ दिवस' आव्हानं पार करत जाणारे आहेत. यात तो यशस्वी होतो का? ती आव्हानं नेमकी आहेत तरी काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल उद्या (२० जुलै) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना होणार आहे. ध्येय वेडा मकरंद म्हणजेच आपला लाडका शशांक केतकर आणि मुग्धा म्हणजे मयुरी देशमुख यांचं नातं हे नियतीने कितीही अवाढव्य संकटं समोर उभी केली तरी त्यातून एकमेकांना सावरत यश गाठणारं. छोट्याश्या आयुष्यात स्वप्नांचा पाठलाग करताना मकरंदला एका वळणावर भेटते सुखदुःख्खात साथ देणारी मीरा म्हणजेच रीना अगरवाल. आता मकरंद, मुग्धा आणि मीरा या रिलेशन ला काय नाव द्यायचं हे प्रेक्षकच ठरवतील. बघताच क्षणी हा संघर्ष मकरंदचा दिसत असला तरीही, त्यापाठी सिनेमाचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, डी.ओ.पी, तंत्रज्ञ मंडळी या सगळ्यांचा '३१ दिवस' पूर्ण करण्यासाठी कस लागला आहे.
बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा, रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडत असताना आशिष भेलकर यांनी आपला मोर्चा आता मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. सभोवालताच्या परिस्थितीचं भान ठेवून मराठी चित्रपटांची निर्मिती होत असते. मात्र भाषाप्रांत सोडून इतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं व्हिजनही तितकंच मोठं असणं गरजेचं असतं. हेच व्हिजन ठेवून '३१ दिवस' सिनेमाचे दिग्दर्शक आशिष भेलकर सांगतात की मराठी चित्रपटांची संहिता ही वाखाणण्या जोगी असतेच मात्र प्रेक्षकांकडून मनोरंजनाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या कथेसोबत सिनेमाच्या निर्मिती मूल्यांकडेही तितकेच बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. '३१ दिवस' सिनेमात आम्ही या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला. निर्माता बी.एस. बाबू यांनी त्या अमलात आणण्याचं स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन दिलं. लेखक उमेश जंगम आणि दिग्दर्शक आशिष यांनी सिनेमातील प्रत्येक घटना प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी तयार केली आहे ज्यामूळे एंटरटेनमेंट सोबत चांगला सिनेमा पहिल्याचं समाधान प्रेक्षक घेऊन जातील. प्रसिद्ध संगीतकार चिनार- महेश यांनी दिलेली गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहेत. सिनेमात एकूण ४ गाणी आहेत त्यातील 'मन का असे' हे रोमँटिक गाणे, 'लगीन सराई ' हे थिरकायला लावणारं आजकालच्या हाय फाय लगीनसराई बद्दलचं हळदीचं भन्नाट गाणं आणि 'रंग वेगळा' हे मोटिवेशनल गाणं या तीनही गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे आणि आता "वल्लाह तू हबीबी" हे सिनेमाचा टर्निग पॉईंट असलेलं गाणं आजपासून रसिक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहणं शक्य होणार आहे. एकंदरीत यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स, १२ मिनिटांचा स्टंट क्लायमॅक्स आणि शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे, नितीन जाधव आणि बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते राजू खेर अशी जबरदस्त कलाकारांची टीम घेऊन मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज असलेला हा सिनेमा उद्यापासून (२० जुलै) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे