सतत नवनवीन चाकोरीबाह्य विषय प्रगल्भतेने हाताळणाऱ्या प्रयोगशील मराठी चित्रपटसृष्टीत आता एक नवीन प्रयोग होऊ घातला आहे… एकपात्री मराठी चित्रपटाचा प्रयोग… आजच्या तरुणाईच्या मनाला भिडणारा एक अस्सल विषय घेऊन मेमोरेबल डेज प्रॉडक्शन्सने ‘मूषक’ या मराठीतल्या पहिल्यावहिल्या एकपात्री चित्रपटाची घोषणा केली आहे. डॉन (DAWN) स्टुडिओज पुणे या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत. वायझेड, पोष्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांमधून खुमासदार अभिनयाची छाप सोडणारा अक्षय टांकसाळे हा गुणी अभिनेता चित्रपटातली एकमेव व्यक्तिरेखा साकारणार आहे.
एका खट्याळ उंदराने एका बॅचलर मुलाच्या आयुष्यात घातलेल्या धमाल गोंधळाची ही मनोरंजक कथा दिग्दर्शित करणार आहे अक्षय जयसिंगराव शिंदे हा नवोदित दिग्दर्शक. विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच तरुणांच्या शिक्षणात-करीअरमध्ये आई-वडिलांचा किती आणि कसा प्रभाव असतो, हे दाखवून तो प्रेक्षकांना अंतर्मुखही करेल.
करिअर निवडताना आई-वडिलांच्या दबावामुळे अनेक तरुणांना स्वतःची स्वप्नं चुरडून टाकावी लागतात, त्याचे त्यांच्या आयुष्यावर किती भीषण परिणाम होतात, हे हसत खेळत दाखवून देणारी ही कथा लिहिली आहे ‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘बेरीज-वजाबाकी’ या यशस्वी चित्रपटांचे लेखक प्रताप देशमुख यांनी. पटकथा देशमुख आणि अक्षय शिंदे यांची असून संवाद प्रताप देशमुख यांनीच लिहिले आहेत.
वैभव जोशी यांच्या गीतांना नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या सुधीर फडके यांच्या जुन्या गाण्याची ओळ घेऊन नवे गाणे बांधण्यात आले असून ते अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.बहारदार संगीताने नटलेला आणि प्रत्येक युवक-युवतीला आपल्या आयुष्याचीच ही कथा आणि व्यथा आहे, असं वाटायला लावणारा हा चित्रपट सध्या निर्मितीअवस्थेत आहे. प्रयोगशील चित्रपटांना नेहमीच उत्तम प्रतिसाद देणारा मराठी प्रेक्षक मराठीतल्या या पहिल्या एकपात्री चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद देतील, याबद्दल शंका नाही.