Join us

संगीतकार सलील कुलकर्णी पहिल्यांदाच करणार ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 3:35 PM

सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली.

ठळक मुद्देसलीलचे दिग्दर्शनात पदार्पण वेडिंगचा शिनेमा चित्रपटाचे सलील करणार दिग्दर्शन व लेखन

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

याबाबत सलीलने सांगितले की, ‘चित्रपटाचे दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्याचा मी नीट अभ्यास केला. माझ्या चित्रपटात आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी आणि असलेली पात्र अशी एक हलकीफुलकी कथा मी मांडत आहे. सगळ्यांना ती स्वत:ची गोष्ट वाटेल आणि कथानकाशी जोडले गेल्याची भावना येईल अशाच पद्धतीने लेखन केले आहे.’ही कथा ज्यांना ज्यांना ऐकवली त्यांच्या ती पसंतीस उतरली आणि त्यांनी हिरवा कंदिल दिला. या गोष्टीत तू हयूमर मांडला आहेस, ती जर दुस-या कुणा दिग्दर्शकाच्या हातात दिलीस तर ती लाऊड होईल असा सल्ला अनेकजणांनी दिल्यामुळे स्वत:च या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.लोकप्रिय परीक्षक, संगीत गुरु ,त्याचप्रमाणे मधली सुट्टीसारख्या कार्यक्रमाचे संकल्पनाकार तसेच लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी याद्वारे लेखक अशा अनेक त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आयुष्यावर बोलू काही चा १५०० हून अधिक कार्यक्रमांचा विक्रम तसेच ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर मैत्र जीवांचे हा जगभरात सादर झालेला कार्यक्रम ही त्यांच्या प्रतिभेला मिळालेली एक विशेष दाद आहे. 

टॅग्स :सलील कुलकर्णी