आपल्या दिलखेच अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या वैभव तत्ववादीचा आणखी एक नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात वैभवसह मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर ही झळकणार आहे. ‘पाँडिचेरी’ या आगामी सिनेमात पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.खुद्द वैभवनेच या सिनेमाची माहिती सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.सचिन कुंडलकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून नोव्हेंबर महिन्यात सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शीर्षकावरुनच या सिनेमाची कथा पॉण्डेचेरीशी संबंधित असणार आहे. खुद्द सचिनने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एरव्ही मुंबई, पुणे, कोकणात मराठी सिनेमांचं शुटिंग होतं. मात्र सचिनच्या या सिनेमाचं शुटिंग निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पॉण्डेचेरीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सचिनने दिली आहे. मात्र या पलीकडे आणखी एक खासियत सचिनच्या या सिनेमात आहे. सचिनचा हा सिनेमा पूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. स्मार्टफोनवर शुटिंगचा हा अनुभव सचिनसाठी पहिलाच असणार नाही. कारण याआधी त्याने गुलाबजाम या सिनेमाचा सुरुवातीचा सीन स्मार्टफोनवरच चित्रीत केला होता. आजमितीला बरेच आंतरराष्ट्रीय सिनेमांचं शुटिंग स्मार्टफोनवर चित्रीत केले जातात. मात्र पॉण्डेचेरी सिनेमा फक्त पुरस्कारासाठी करत नसल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे. मराठी सिनेमांमधून वेगळंच समाधान मिळतं असं सचिनने स्पष्ट केलंय. तसेच आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत झळकलेली सई आणि वैभवची केमिस्ट्री अनुभवणं प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असणार आहे.
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर आणि मिस सदाचारी या चित्रपटांमधून वैभवने रोमँटिक भूमिकेतून महाराष्ट्रातील तरुणींना फिदा केलं होतं. हंटर, बाजीराव मस्तानी, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा बॉलिवूड चित्रपटांमधूनही वैभवने कामं केली आहेत. बाजीराव मस्तानीमधील त्याच्या चिमाजी आप्पा या ऐतिहासिक भूमिकेचंही फार कौतुक झालं होतं. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखामधील भूमिकाही गाजली. सध्या तो मणिकर्णिका- दि क्विन ऑफ झांसी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून या चित्रपटातही तो ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे वैभवच्या या विविधांगी भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतूर झाले आहेत.