प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'फुलवंती'मधील प्राजक्ताच्या अभिनयाचं सध्या चांगलंच कौतुक होतंय. प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' सिनेमाचं खूप कौतुक होतंय. प्राजक्ता माळी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. प्राजक्ता माळी तिच्या फिटनेसबद्दलही खूप जागरुक आहे. प्राजक्ता माळी स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करते? याच्या टिप्स तिने सर्वांना दिल्या आहेत.
प्राजक्ता माळीने सांगितल्या फिटनेस टिप्स
प्राजक्ता माळीने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय की, "आपण शारीरिक स्वास्थ्य म्हणतो तर त्यात आपण मानसिक स्वास्थ्यही समाविष्ट केलं पाहिजे. त्यासाठी मी प्राणायाम, ध्यान आणि योग ही त्रिसुत्री फॉलो करते. आज अडीच वाजलेत तर मी सकाळी घरातून प्राणायाम करुन निघालेय. माझी टीम सकाळी लवकर आली तर मी त्यांना बसवून भ्रस्तिका वगैरे सर्व केलं. अर्ध्या तासाचं प्राणायाम आणि १० मिनिटांचं मेडिटेशन हे माझ्या आयुष्यात कंपलसरी आहे. मानसिक व्यायाम तुम्हाला शारीरिक व्यायाम करतानाही साहाय्यभूत ठरतं."
प्राजक्ता पुढे म्हणते, "मी इथे नमूद करु इच्छिते मी अष्टांगयोग करते. अष्टांगयोग हा जनरल योगपेक्षा advance लेव्हलचा योग आहे. या योगाचं वैशिष्ट्य हे आहे की, कुठेही तुम्हाला धाप लागत नाही. तुम्ही रनिंग, सायकलिंग, जिमिंग करता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे धाप लागते. जिमिंगच्या मी पूर्ण विरोधात आहे कारण तुम्ही तुमचं शरीर तापवत असता. पण तुम्ही AC मध्ये व्यायाम करता त्यामुळे बाहेरुन शरीर थंड होतं. शरीरातल्या Toxin ना बाहेर पडायचं असतं. पण AC मुळे खूप गोंधळ होतो. जीममध्ये व्यायाम करणं ही खूप वाईट गोष्ट आहे."
प्राजक्ता शेवटी म्हणते, "योग हे तुम्हाला श्वासोच्छावासावर करायचे असतात. श्वासांनुसार तो व्यायाम तसा बांधला गेलाय. अष्टांगयोगमध्ये तुमच्या अंतर्गत आतड्यांनाही व्यायाम होतो. याचा मला खूप फायदा होतो. फक्त तो शिकणं महत्वाचा आहे. जिथे पिकतं तिथे किंमत नसते. आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचा व्यायाम, तिथलं पिकवलेलं अन्न खाणं हे इष्ट असतं. मी रोज जरी करत नसले तरीही आठवड्यातून दोन दिवस घाम येईल एवढंतरी करत असते."
प्राजक्ता पुढे म्हणली, "अष्टांगयोगाची सीरिज करायला एक तास लागतो. पण मला तेवढं नाही जमत आहे तर सणसणून घाम येईल इतका १५ मिनिटांचा व्यायाम मला कसा करायचा माहितीये. आणि रोज मी काहीही झालं तरी ध्यान करतेच. म्हणजे गाडीत बसले तरीही मी सर्वांचे मोबाईल बंद करुन ध्यान करते. त्यामुळे ध्यान, योग आणि प्राणायाम या तीन गोष्टी केल्यात तर तुम्हाला बाकी काही करायची आवश्यकता नाही. या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्यात तर तुम्हाला नक्की फायदा होईल."