2019 या वर्षांत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
श्रीराम कोल्हटकरमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे 3 ऑगस्टला राहात्या घरी हृदयविकाराच्या झटक्यान निधन झाले. त्यांनी आपला माणूस, अ डॉट कॉम मॉम, एक अलबेला, उंच भरारी, करले तू भी मोहोब्बत यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती.
आशा पाटीलमराठी चित्रपटांवर आपला आगळा ठसा उमटवणारे दादा कोंडके यांच्या 'आई' आणि 'मावशी' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांचे 18 जानेवारीला खाजगी रुग्णालयात निधन झाले. आशा पाटील यांच्या 'सामना', 'माहेरची पाहुणी', 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या.
शुभांगी जोशीआपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं 5 सप्टेंबरला मुंबईत राहत्या घरी झोपेतच निधन झालं. आभाळमाया, काहे दिया परदेस या मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीपर्यंत त्या कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत काम करत होत्या. त्यांची या मालिकेतील जीजीची भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती.
अरूण काकडेआविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाटयसंस्थेचे संस्थापक सदस्य अरूण काकडे यांचं 11 ऑक्टोबरला मुंबईत निधन झालं. अरूण काकडे ६० वर्षाहून जास्त काळ रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांचं अमका हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं होतं. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
किशोर प्रधानमराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे 12 जानेवारीला निधन झाले. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यांसारख्या गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय, 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट'मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.