Join us

सुरेश वाडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी जिया वाडकरचा चित्रपटसृष्टीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 10:36 AM

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये येणारे अनेक स्टार किड आपल्याला पाहायला मिळतात. केवळ अभिनयक्षेत्रातच नव्हे तर दिग्दर्शन, गायन ...

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये येणारे अनेक स्टार किड आपल्याला पाहायला मिळतात. केवळ अभिनयक्षेत्रातच नव्हे तर दिग्दर्शन, गायन या क्षेत्रात देखील हे आपले नशीब आजमावत असतात. आता आणखी एक स्टार कीड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन फिल्मसची निर्मिती असलेल्या ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटासाठी जियाने गाणं गायले आहे. या चित्रपटातील ‘मोठ्या मोठ्या लाटांवरी आता तरी पोहू दे’... ‘चमचमणारी स्वप्न सारी आता खरी होऊ दे’... हे टायटल साँग जिया हिच्या सोबत मंदार पिळवलकर याच्या आवाजात नुकतंच ध्वनिमुद्रित करण्यात आले. जिया हे गाणे गाण्यास खूपच उत्सुक होती. गाण्याचे रेकॉर्डिंग करण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला होता. जियाची आई पद्मा वाडकर या देखील प्रसिद्ध गायिका आहेत.मुलगी आणि वडिलांचे नाते हे खूप लाघवी आणि हळवे असते. अव्यक्त तरी खूप काही बोलून जाणारे! वडिल मुलीचे नाते अधोरेखित करणारे सचिन पाठक लिखित हे गीत मनाला नक्कीच स्पर्शून जाईल असा विश्वास संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल असे सांगत, गाणं गाण्यातला आनंद जियाने याप्रसंगी बोलून दाखवला.रोहित शिलवंत दिग्दर्शित ‘परी हूँ मैं’ या आगामी चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. ‘योगायतन’ ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर यांनी केले आहे. कला दिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळत आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते संजय गुजर असून क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत.Also Read : सुरेश वाडकर कोणाला म्हणतायेत मिले सुर मेरा तुम्हारा?