दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (prabhas) याच्या गाजलेल्या 'बाहुबली' (bahubali)या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाला मानवंदना देत 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' हे चित्रपट मराठीत डब करण्यात आले. दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी या चित्रपटाच्या डबची जबाबदारी घेतली. आणि, ही जबाबदारी लिलया पार पाडत हे दोन्ही चित्रपट शेमारु मराठीबाणावर प्रदर्शित झाले. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe ) यांनी अमरेंद्र बाहुबली या मुख्य भूमिकेला आपला आवाज दिला आहे. त्यामुळे त्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या डबिंगचा अनुभव शेअर केला आहे.
प्रश्न: मराठीत डब झालेल्या बाहुबली या चित्रपटातील मुख्य भूमिकेला तुमचा आवाज लाभला आहे. तर पहिल्यांदाच केलेल्या या डबिंगच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
उत्तर: बाहुबलीच्या डबिंगसाठी मला संधी दिली यासाठी मी शेमारु मराठीबाणाचा मनापासून आभारी आहे. कारण, बाहुबली हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. आणि खरं सांगायचं तर अजूनतरी आपल्या मराठीत इतक्या मोठ्या जॉनरच्या चित्रपटाचं मराठीत डबिंग होत नाही. पण बाहुबलीच्या माध्यमातून मला डबिंगसाठी काम करायला मिळालं याचं समाधान आहे. सुरुवातीच्या काळात या चित्रपटासाठी किती वेळ देता येईल याबाबत साशंक होतो. कारण, कलाविश्व, राजकीय क्षेत्र यातून वेळ काढत या चित्रपटासाठी कसं काम करता येईल याबाबत शंका होती. पण, प्रविण तरडे आणि त्यांच्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवला. आणि, अवघ्या दोन ते अडीच दिवसांत या चित्रपटाचं डबिंग मी पूर्ण करु शकलो.
प्रश्न: शेमारु मराठी बाणा वाहिनीच्या बाहुबली प्रोजेक्टच्या निमित्ताने तुम्ही डबिंग क्षेत्रात पदार्पण केलं. या क्षेत्राविषयी काय सांगाल?
उत्तर: या क्षेत्राविषयी मी खूप ऐकून होतो.हिंदीमध्येही अनेक चित्रपटांचं डबिंग झालं आहे. आणि, मराठीतही डबिंग क्षेत्रात खूप नाव कमावलेले दिग्गज मंडळी आहेत. पण, हा माझा स्वत:चा पहिला अनुभव आहे आणि शेमारू मराठीबाणामुळे एक कलाकार म्हणून माझ्यासाठी नवं क्षेत्र खुलं झालं.
प्रश्न: अभिनय, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत असताना व्हॉइस अॅक्टिंगकडे किंवा डबिंग क्षेत्रामध्येही नशीब आजमावं असं का वाटलं?
उत्तर: नक्कीच मला या क्षेत्रात काम करताना आनंद झाला. कारण, आपण कायमच नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत.माझ्यासाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव होता. एखाद्या भाषांतरीत गोष्टीसाठी डबिंग करणं किंवा स्वत:च्याच आवाजात एखाद्या सिनेमात डब करणं यापलिकडे मी कधी काही केलं नव्हतं. त्यामुळे हे नवीन क्षेत्र एक्स्पोअर करायला मिळालं आणि ती गोष्ट इतकी दर्जेदार असते याचा आनंदच वेगळा असतो.
प्रश्न: आजकाल व्हॉइट अॅक्टिंगसाठी अनेक कोर्स सुरु झाले आहेत. तर तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं का?
उत्तर: प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी कधीच अभिनयाचंही प्रशिक्षण घेतलं नाही आणि व्हॉइस ओव्हर अॅक्टिंगचंदेखील. पण या सगळ्यामध्ये मराठी रंगभूमीचा खूप फायदा झाला. मी मराठी रंगभूमीवर थोडं फार काम केलं आहे. यात नाटकंही मी मोजकी केली असतील. पण, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात त्याचे प्रयोग झाले. त्यामुळे या प्रयोगांचा आणि दौऱ्यांचा आवाजाला एक जराक म्हणजे आवाज कमावणं जे म्हणतो ते झालं. पण डबिंगचं रितसर प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नाही.
प्रश्न: अभिनयक्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि आता डबिंग क्षेत्र असं एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या ताण-तणावाचं नियोजन कसं करता?
उत्तर: यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आवड असणं. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्राची आवड असेल तर त्या क्षेत्रात काम करताना कंटाळा किंवा ताण येत नाही. आणि, अभिनय आणि राजकीय क्षेत्र दोन्ही आमच्या आवडीचे आहेत. त्यामुळे मला तिथल्या कामाचा ताण जाणवत नाही. त्यातच अभिनय आणि राजकीय ही दोन्ही डिमांडींग क्षेत्र आहेत. त्यातही मी अभिनय क्षेत्रात खूप निवड काम करतो. त्यामुळे स्ट्रेज मॅनेजमेंट योग्यरित्या करता येतं. तसंच योग, प्राणायाम आणि वर्कआऊट या गोष्टीतून खूप सकारात्मकता मिळते. त्यामुळे या गोष्टी मी करतो.
प्रश्न: या क्षेत्रात तुम्ही यशस्वी आहात आणि हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. पण या यशामागचं मुख्य कारण काय?
उत्तर: आई-वडिलांचा आशीर्वाद, कुटुंबाची साथ आणि काही तरी चांगलं करावं ही भावना. त्यामुळे मग त्यासाठी लागणारं कष्ट घ्यायची तयारी असेल, अभ्यास असेल तर या सगळ्या गोष्टी ओघाने येतात. पण दोन गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे यश अनुभवताही येतं, पचवताही येतं आणि त्याचा आनंदही घेता येतो. एक म्हणजे आरश्यासमोर उभं राहून स्वत:च्या नजरेला नजर देता आली पाहिजे. आणि, अंथरुणावर पाठ टेकल्यावर सुखाची झोप लागली पाहिजे.
प्रश्न: या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल
उत्तर: माझ्या मते, आपल्या प्रत्येक माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यामुळे महाराज डो,ला वाटतं. कारण, महाराजांची संपूर्ण चरित्र आपण वाचली तर त्यातून महाराजांची एक भावना दिसून येते.ती म्हणजे 'इदं न मम' त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या यशाकडे प्रयत्न म्हणून तुम्हाला पाहता यायला हवं. यश आणि अपयश हे दोन्ही टप्पे आयुष्यात येत असतात. येणारं जातंही. परंतु, तुम्ही ठाम रहा. ज्यामुळे येणाऱ्या लाटेसोबत तुम्ही वरही जात नाही आणि तळालाही जात नाही. त्यामुळे जर तुमचे पाय तुम्हाला जमिनीवर ठाम रोवून ठेवता आले तर येणारं यश तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे आणि येणारं अपयश पचवता आलं तर या क्षेत्रात टिकून राहणं सहज शक्य आहे.