दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. गेले काही दिवसांपासून त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल झाले. दिग्दर्शक केदार शिंदे यांचं विशेष कौतुक झालं. आता त्यांच्या कामाची दखल थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत घेण्यात आली आहे.
केदार शिंदे हे यंदाच्या ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये झळकले आहेत. जवान सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रा या दिग्गज दिग्दर्शकांसोबत केदार शिंदे झळकले आहेत. यावर बेला शिंदे पोस्ट करत म्हणाल्या, 'काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली.. Forbes India magazine मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल'.
पुढे त्यांनी लिहलं, 'थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहीलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पहात आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्ही सगळ्यांचं प्रेम कायम राहो...अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ'. त्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहलं, 'सुंदर, पडत्या काळात तुम्ही मराठी चित्रपटाना चांगले दिवस दाखवले'. तर एकाने लिहलं, 'वाह्ह दादा वाह्ह...खूप अभिनंदन ही सगळी स्वामी कृपा... सगळ्या मराठी प्रेक्षकांना तुमचा अभिमान वाटतो.. तुमच्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा'. तर आणखी एकाने म्हटलं, 'केदारजी, आपले मनःपूर्वक अभिनंदन'. तर केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा' शिवाय 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
याशिवाय, बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शक साई पियूष यांच्या कामाची दखल 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' ने घेतली. याविषयी व्यक्त होताना साई-पियूष यांनी म्हटले की, '२०२३ साली 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा आला आणि या सिनेमाने आम्हाला भरपूर यश अनुभवायला दिलं. चांगल्या गोष्टी त्या सिनेमामुळे आमच्या आयुष्यात घडल्या. गेली पंधरा वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतोय, अनेक सिनेमे गाणी हिट झाली.
पुढे म्हटलं, 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023' मध्ये एकंदरीत भारतीय संगीतकारांपैकी आमचं नाव तेथे होतं, जे सगळ्या रिजनल संगीतकारमध्ये फक्त आमचं नाव आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कष्ट, मेहनत आणि चांगलं काम झाल्यामुळे त्याची नोंद 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये झाली याचा आम्हाला अभिमान वाटतोय. 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये आमचं नाव येईल आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. या यशासाठी आम्ही 'बाईपण भारी देवा'चे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मनापासून आभार मानतो'.